शरद पवार, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ता जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, अशी सरळसोट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात मांडली. मुख्यमंत्रीपद मी क्षणात सोडले होते आणि पुन्हा लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. महाराष्ट्र लुटायला आलेल्यांना सांगूया की एकतर तुम्ही रहाल किंवा आम्ही! होऊन जाऊ दे, असे आवाहनही त्यांनी केले. जागावाटप सुरळीत पार पडेल, चिंता नसावी, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा हा संयुक्त पदाधिकारी मेळावा आज पार पडला. लोकसभेत राजकीय शत्रूला पाणी पाजले, आता आगामी निवडणुकीलाही एकजुटीने सामोरे जाऊन विजयश्री मिळवूया, असा निर्धार करत महाविकास आघाडीने आज मुंबईतील संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात विधानसभेच्या लढाईचे रणशिंग फुंकले. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद, जागावाटप आदी विविध मुद्दय़ांवर शिवसेनेची भूमिका मांडली.
मी स्वार्थासाठी नाही, महाराष्ट्रासाठी लढतोय!
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे, उद्धव ठाकरे की आणखी कोण अशा चर्चेला उद्धव ठाकरे यांनीच आज छेद दिला. मी माझ्यासाठी लढतोय ही भावनाच माझ्यात नाही. मुख्यमंत्रीपद मी क्षणात सोडले होते आणि पुन्हा लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचे काय करायचे ते आमचे आम्ही बघू असे सांगत त्यांनी चर्चा घडवणाऱयांना चपराक लगावली.
हाती मशाल घेऊन मिंध्यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका
गद्दार, तोतयांनी शिवसेना चोरली. पण या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरले असले तरी त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. लोकसभेला मशालीचा प्रचार करायला वेळ कमी पडला. तरीही यश मिळवले. राष्ट्रवादीचाही पक्ष आणि निशाण चोरले. काँग्रेसच्या नशिबाने अजून त्यांचा हात कायम आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी वाजवणारा मावळा गावागावात, घराघरात पोहोचवा आणि हातात मशाल घेऊन मिंध्यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही दूत बनावे
पैसे देऊन मिंधे सरकारचे योजनादूत गावात फिरणार असतील तर तुम्हीही महाविकास आघाडीचे दूत व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱयांना केले. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे सांगा, असे ते म्हणाले. कोरोनाकाळात महाविकास आघाडीने केलेली कामे लोक विसरावेत म्हणून निवडणूक लांबवण्याचा खटाटोप सुरू आहे, असेही ते पुढे म्हणाले.
अधिकारी म्हणताहेत, मिंधे दमदाटी करताहेत… साहेब लवकर परत या
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आयएएस अधिकाऱयांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे. त्याबाबत सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजना थांबवू का, असे न्यायालयाने फटकारल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चिडचिड होतेय. अनेक आयएएस अधिकारी सांगताहेत, साहेब लवकर परत या… यांची दडपशाही, दमदाटी चालू आहे. मिंधे त्यांना म्हणतात, मी चांगल्या भाषेत सांगतोय तोपर्यंत ऐका, नाहीतर दुसरे रूप दाखवावे लागेल. यांचे दुसरे रूप काय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात ‘गद्दार… गद्दार…’ असा आवाज घुमला. ते ऐकताच उद्धव ठाकरे उपस्थित पदाधिकाऱयांना म्हणाले, बरोबर मुद्दय़ाला हात घातलात, मिंध्यांचे खरे रूप तेच आहे आणि तेसुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचे काम तुमचे आहे.
पुढच्या जन्मी तरी न्यायदेवता पावेल
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला होणाऱया विलंबावरूनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ‘न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबतचा निर्णय येत्या 50-60 वर्षांत नक्की मिळेल, मला खात्री आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला. लवकरची तारीख द्या अशी विनंती केली तर न्यायाधीश म्हणतात आम्हाला आदेश देऊ नका, मग हात जोडून विनंती करतो, असे सांगत, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी न्यायदेवता आम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बांगलादेशातील लोकशाही सरन्यायाधीशांना मान्य आहे का?
बांगलादेशातील स्थिती पाहता आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित होते असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याचा दाखला देत यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला. ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वातंत्र्य केले त्या बांगलादेशमुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य अधोरेखित होणार असेल तर आपण या देशात कशाला जन्माला आलो? बांगलादेशात जनता रस्त्यावर उतरली आहे, तेथील पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला, ती लोकशाही सरन्यायाधीशांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, चंद्रचूड म्हणतात स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर भूतकाळात डोकवावे लागेल. मान्य आहे, पण भूतकाळात डोकावले तर आम्हाला रामशास्त्राr प्रभुणे दिसतात. हा जो गुन्हा आहे त्याला देहांताशिवाय दुसरी शिक्षा नाही हे राघोबांना निक्षून सांगणारे रामशास्त्राr प्रभुणे आमच्या भूतकाळात लपलेले आहेत. आपणही कधीतरी भूतकाळात जाणार आहोत. त्यावेळी असेच आणखी काही घडले आणि स्वातंत्र्याचे महत्त्व कळण्यासाठी भूतकाळात डोकवावे लागले तर त्यावेळी चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काय केले आणि आम्ही राजकारणी म्हणून काय केले हेसुद्धा नमूद झालेले असेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
…म्हणून मुस्लिम शिवसेनेसोबत आले
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपच्या राजवटीत देशात हिंदू-मुस्लिम आणि महाराष्ट्रात समाजासमाजात आगी लावल्या जाताहेत. लोकसभा निवडणुकीत केवळ मुस्लिम समाजानेच नव्हे तर बौद्धांनी, मराठी माणसांनी, हिंदूनी शिवसेनेला भरभरून मतदान केले. महायुतीतले गद्दार विसरले, पण कोरोनाकाळात आपण ज्यांना वाचवले ते मुस्लिम आणि बौद्ध शिवसेनेला विसरले नाहीत. सीएए, एनआरसीच्या वेळीही भयभीत वातावरण झाले होते. त्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून सांगितले की, जे या देशाचे नागरिक आहेत, जे देशावर प्रेम करतात त्यांना मी बाहेर जाऊ देणार नाही. म्हणून मुस्लिम शिवसेनेसोबत आले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदू देवस्थानांची जमीन ढापणाऱयांची यादी जाहीर करा
वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींनी हडपल्याचा मुद्दा गाजतोय. त्यावर बोलताना, महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांची जमीन किती लोकांनी ढापलीय त्याचीही यादी जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. वक्फ असेल वा हिंदू संस्थानांच्या जमीन असोत, त्यात आम्ही वेडेवाकडे होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अयोध्येच्या राम मंदिराजवळची जमीन कोणाला दिली त्याचीही जेपीसीकडून चौकशी करा आणि केदारनाथचे सोने चोरून पितळेला मुलामा कुणी दिला त्याचेही पितळ उघडे पडले पाहिजे, असेही त्यांनी बजावले.
आरक्षणाची मर्यादा वाढवा, आम्ही पाठिंबा देतो
मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ावरही उद्धव ठाकरे यावेळी स्पष्टपणे बोलले. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहारने वाढवलेली मर्यादा कोर्टाने फेटाळली. हा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे. अन्यथा राष्ट्रपती ते करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल आणि सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. इतके होऊ शकते तर मराठा आरक्षणाचे बिल लोकसभेत आणून आरक्षणाची मर्यादा वाढवा, ओबीसींचे आरक्षण तसेच ठेवा, धनगरांना आणि सर्वांना आरक्षण द्या, आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्याला पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जागावाटपामध्ये एखादी जागा आघाडीतील दुसऱया पक्षाला गेली म्हणून काम करायचे नाही असे करू नका. वज्रमूठ केवळ शब्दात नाही तर कामातून दिसली पाहिजे, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या पदाधिकाऱयांना केले.
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, अॅड. अनिल परब, राजन विचारे, विनायक राऊत, उपनेता सुषमा अंधारे, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार ऋतुजा लटके, मिलिंद नार्वेकर, नसीम खान, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, सतेज पाटील, अमीन पटेल, शेकापचे जयंत पाटील, माकपचे कॉ. रानडे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सागर संसारे, मिलिंद सुर्वे उपस्थित होते.
मोदीजी, तुम्ही हिंदुत्व सोडले का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सेक्युलर संविधान, सेक्युलर सिव्हिल कोडवर बोलले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, सेक्युलर सिव्हिल कोडवर बोलता मग तुम्ही हिंदुत्व सोडले का? चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या मांडीला मांडीला लावून बसलात मग तुम्ही हिंदुत्व सोडले नाहीत? मग आगी लावण्यासाठी वक्फ बोर्डाचे बिल का आणलेत आणि हिंमत होती तर मंजूर का करून दाखवले नाहीत, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मिंधे सरकारच्या योजना हाच मोठा घोटाळा
मिंधे सरकारने आणलेल्या योजना हाच एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी 50 हजार योजनादूत नेमण्यात आले आहेत. हे योजनादूत मिंध्यांचेच चेलेचपाटे असणार. या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि लाडक्या बहिणीला फक्त दीड हजार रुपये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या दूतांची खोटी नावे दाखवूनही पैसा ओरबाडला जाईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मिंधे सरकारच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरात करण्यासाठी जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे. हासुद्धा मोठा घोटाळा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईला काsंबडी म्हणून कापाल तर मुंबईकर तुम्हाला कापतील
मिंधे सरकारने मेट्रो तसेच अन्य बांधकामांसाठी मुंबईची हालत करून ठेवली असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मेट्रोसाठी, इमारतींसाठी बेसुमार खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी धरणे भरली तरी मुंबईकरांची तहान भागत नाही. काही ठिकाणी गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. भाजपने मुंबई आणि मुंबईकरांना कधी आपले मानलेच नाही, स्वतः शाकाहारी असलेले मोदी-शहा मुंबईकडे सोन्याचे अंडे देणारी काsंबडी म्हणून बघत असतील तर येत्या निवडणुकीत मुंबईकर तुमची काय हालत करतील ते कळेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
मोदीजी, सेक्युलर सिव्हिल कोडवर बोललात, मग तुम्ही हिंदुत्व सोडले का?
आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही महाराष्ट्राला झुकवण्याची. तसा प्रयत्नही कुणी केला तर त्याला हा महाराष्ट्र गाडून टाकतो. त्या इतिहासाची पुनरावृत्तीच महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत करायची आहे.
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नकोच!
विधानसभेला ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण महाविकास आघाडीमध्ये नकोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपबरोबर युतीत असताना जो अनुभव घेतलाय तो आता नको. त्यावेळी जागावाटपासाठी बैठका व्हायच्या आणि ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री असे ठरायचे. परंतु त्या धोरणामुळे मग एकमेकांच्या पायावर धोंडे घातले जायचे, पाडापाडीचे राजकारण व्हायचे. मग युतीला काय महत्त्व राहिले. म्हणून आधी ठरवा आणि मग पुढे जा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी मांडली.
विधानसभेतील लढाई महाराष्ट्रधर्म रक्षणाची!
निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आम्ही तयार आहोत असे सांगतानाच, आगामी लढाई वाटते तेवढी सोपी नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणूक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. विधानसभेतील लढाई ही महाराष्ट्रधर्म रक्षणाची, महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्याची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.