दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत, महापालिकांच्या तिजोऱ्या खणून काढतायत; उद्धव ठाकरे कडाडले

”फडणवीस बोलतात महापालिकांच्या ठेवी काय चाटायच्या असतात? यांच्या गद्दार साथिदाराने नवी मुंबई, ठाण्याच्या ठेवी चाटून साफ केल्या आहेत. मोदींचं षडयंत्र आहे की संपूर्ण देश अदानीच्या हातात द्यायचा आणि महापालिका भिकारी करायच्या. त्यासाठी महापालिकांच्या तिजोऱ्या खणून काढतायत. महाराजांनी लोकांसाठी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत”, असा घणाघात शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याती सभेत केला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवरून भाजप व गद्दारांवर जोरदार टीका केली.

”आज सकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरतोय. डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मधळा तो व्हिडीओ आहे. घराघरात पैशांची पाकिटं पोहचतायत. आता निवडणूक संपली आहे. आता नेमणूका सुरू आहेत. मला असं वाटतं भविष्यात या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. तुम्हाला सर्वांना माहित आहे की देश कोण चालवणार आहे आणि आपण बसूया महापौर कोण होणार म्हणून भांडत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

”आज मला एकाने विचारलं की तुमची युती कशी झाली. मी त्यांना सांगितलं की आमची युती जागा वाटपासाठी झाली नाही तर मराठी माणूस जागा करण्यासाठी झाली. जागा वाटप कसलं. आमचीच जागा आहे. आपण सगळे एका मातीची लेकरं आहोत. असं सांगितल्यावर दुसरा प्रश्न येतो, की तुम्ही मराठी मराठी करता मग इतर भाषिकांचं काय. मी सांगितलं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण आमच्याच घरात घुसून आमच्यावर जो दादागिरी करतोय जर त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं. एखाद्या राज्यात जाऊन हे शहर त्याचं नाही असं जर कुणी म्हणत असेल तर त्यांना तिथल्या तिथे उभा चिरतील. आम्ही सहनशील आहोत. आम्ही सर्वांना आपलं मानत आलो. आता आपलं मानता मानता आमच्यावरच दादागिरी सुरू झाली आहे. त्यामुळे जे कुणी दादागिरी करतायत त्यांना थोडं कानफटाएवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं. मराठी आमची आई आहे. हिंदी आमची मावशी आहे पण या गद्दारांसोबत मुंबईचा एक गद्दार गेला होता. तो म्हणतो की आई मेली तरी चालेल. अरे आई वर वार करणारी औलाद या महाराष्ट्रात निपजू कसे शकतात ते कळत नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना फटकारले.

“जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तो आता ठाणेकरांशी गद्दारी करायला लागला आहे. एक हजार एकरची वन जमिन त्यांनी देऊन टाकली आणि बावनकुळे म्हणतात की मला वनजमीन होती ते माहितच नव्हतं. मी देखील मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक इंच वनजमीन उद्योगपतीला दिली नव्हती. उलट वनजमीनी वाढवल्या होत्या. माझ्या काळात जेवढी जंगल जमीन वाढवली तेवढी कुणी वाढवली नसेल, असं उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने सांगितले. पुढे त्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरूनही सरकारवर टीका केली. ”गणेश नाईकांनी बिबटे मानवी वस्तीत दिसले तर शूट अॅट साईट असे ऑर्डर दिले होते. मग माणूस जर बिबट्यांच्या वस्तीत दिसला तर काय करायचं. उद्योजकांसाठी जो कुणी जंगलाची जमीन सही करून देत असेल त्या सही करण्याला शूट अॅट साईन करण्याचे ऑर्डर देण्याची हिंमत गणेश नाईकांमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

”या ठाण्यावर बाळासाहेबांचं अतोनात प्रेम. 2012 साली जी शेवटची सभा झाली आम्ही सगळे चिंतेत होतो. त्यांना सांगत होतो की सभा घेऊ नका. तेव्हा ते म्हणाले की मी दोनच सभा घेणार एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. एवढं प्रेम होतं बाळासाहेबांचं ठाण्यावर. आज शहरात जे विकासाचे होर्डिंग लागले आहेत. ही विकासाची गती नाही तर विनाशाची गती आहे. विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं मंजूर केली जातायत. पुढे त्या कामाचं काय होईल माहित नाही. ठाण्याला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये पाहा ना. मुलुंडचे भाजपचे आमदार मिहीर कोटेचा मेट्रोच्या कामाची पाहणी करायला गेलेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की शंभर ठिकाणी वायू प्रदुषणाच्या मानकांचं उल्लंघन विकासकाने केलेलं आहे. काय झालं त्याचं पुढे. देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काही कळत नाही. मला तर वाटतं भाजप आणि प्रशासनाचा काडिमात्र संबंध नाही. प्रदूषण इतकं वाढलंय की श्वास घेतला तर त्रास होतोय. आता फक्त श्वास घेणं हाणिकारक आहे अशा पाट्या लावणं बाकी राहिलं आहे. या गद्दारांना त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांचं काम झालं की ते जातील निघून इथून गद्दार हेलिकॉप्टर घेऊन जातील फाईव्ह स्टार शेतात. फडणवीस जातील नागपूरमध्ये आणि तिसरे जातील काका मला वाचवा करत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.