
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर अतिविराट सभा पार पडली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवतीर्थावर होणारी ही पहिलीच सभा असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सैनिक शिवतीर्थावर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण करत महापालिकेच्या निवडणूकीचा शंखनाद केला.
शिवसेना आहे तोपर्यंत मुंबईचा घास गिळता येणार नाही, म्हणून भाजपला शिवसेना नकोय- उद्धव ठाकरे pic.twitter.com/NychW2CCsf
— Saamana Online (@SaamanaOnline) January 11, 2026
”महाराष्ट्र कधी मरू शकत नाही, महाराष्ट्र कुणी मारू शकत नाही आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही हे दाखवण्याची वेळ आली आहे. ही एकजूट त्यासाठीच केली आहे. रक्त सांडून मिळून दिलेली आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही, झुकू देणार नाही ही शपथ घेऊन युद्धाला सामोरे जातोय”, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मुंबईच्या प्रदूषणातही भ्रष्टाचार आहे, उद्धव ठाकरे यांचा घणाघात #BMCElection2026 pic.twitter.com/fPUyvaDZyO
— Saamana Online (@SaamanaOnline) January 11, 2026
काही लोकं विचारतात की ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? ठाकरेंचं अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला आलेला नाही. हे समोर बसलेले सर्व ठाकरेंचे अस्तित्व आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्या मागचा यांचा डाव काय होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला पहिले पाच जण जे पुढे होते त्यात आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा. हे सगळं रक्तात असावं लागतं. आमच्या डोळ्यादेखत आमच्या राज्याचे, घराचे, भाषेचे लचके तोडले जात असताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्यांना वाटतंय. आज जे काही राजने मांडलंय तेच आम्हीही सांगतोय. मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय. आमच्यात तसे वाद नव्हते. पण ते वाद आज आम्ही गाडून टाकले आहोत व मराठी माणसासाठी ताकद बनून उभे राहिलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
”2010 साली आम्ही मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचं एक दालन केलंय आज जाऊन पाहा त्याची काय अवस्था झाली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभे करून शकलो कारण महापालिका आपल्याकडे होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ कुठेही नव्हता. मुळात हे लढणारे नाहीत, हे घरं पेटवून पोळ्या शेकणारे आहेत. घरं पेटवणारे आहेत. आगी लावायच्या. संयुक्त महाराष्ट्र समिती माझ्या आजोबांनी व इतर पक्षांनी स्थापन केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी मोरारजी देसाई या नरराक्षसाने दिसता क्षणी गोळ्या घाला असे आदेश दिले होते. ते मोरारजी देसाई हिंदूच होते व मरणारे सर्व मराठी होते. एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की तेव्हा हा जनसंघ कुठेही नव्हता. गोळीला तुम्ही पोळीला आम्ही ही यांची वृत्ती आहे. त्या सगळ्या लढ्यात अण्णाभाऊ साठे होते, शाहीर अमरशेख हा महाराष्ट्रप्रेमी मराठा होता. तो ठणकावून सांगायचा दो कवडी के मोल मराठा बिकनेको तयार नाही. हे अमरशेखांनी दिल्लीश्वरांना ठणकावून सांगितलं होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”आमची मुंबई, मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव मुंबई ठेवलेलं आहे. यांना त्या मुंबईचं परत बॉम्बे करायचं आहे. तो अण्णामलाई आला आणि नकळत भाजपच्या मनातलं काळं बोलून गेला. लोकसभेच्या वेळी यांनी अब की पार 400 पारचा नारा दिला होता. त्यावेळी यांच्याच खासदाराने बिंग फोडलेलं की यांना संविधान बदलायचं आहे असं सांगितलं होतं. का तर हे संविधान एका सामान्य माणसाने लिहलेलं होतं. यांना आता आपली सोन्या सारखी मुंबई लुटायची आहे. मुंबईच्या ठेवी ज्या आपण 92 हजार कोटींपर्यंत नेल्या होत्या त्या आता यांनी 70 हजार कोटींपर्यंत खाली नेल्या आहेत. तीन लाख कोटींचं कर्ज करून ठेवलंय. आम्हाला महापालिका का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय पण भाजपला महापालिका पाहिजे कारण यांना मुंबई अदानीच्या हातात घालायची आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
”25 वर्षात शिवसेनेनी केलेली कामं आणि गेल्या चार वर्षात यांनी धुवून टाकलेली कामं हे डोळ्या समोर आणा. आज संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे. एका पर्यावरण तज्ज्ञाने सांगितलं की दिल्ली व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई आयसीयूमध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. संपूर्ण मुंबई खोदलेली आहे. इकडे खड्डे, तिकडून बोगदा, इकडून मेट्रो, तिकडून फुटपाथ खोदलाय. संपूर्ण मुंबईत धूळ सिमेंटचं साम्राज्य आहे. त्या प्रदूषणातही भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी वापरलं जातं त्यातलं 50 ते 60 टक्के सिमेंट अदानीच्या कंपनीकडून खरेदी केलं जातंय. आपण घाम गाळून नाही तर रक्त सांडून ही मुंबई मिळवलेली आहे. आमच्या घराचे कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्या सारख्या सैनिकांच्या मदतीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे आहोत. आमच्यासाठी यायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
”ही काही पहिली निवडणूक नाही. शिवसेनेनला 60 वर्ष होतील अनेक निवडणूका आल्या. काही हरलो काही जिंकलो. युत्या होतात आघाड्या होतात. लोकं दूर जातात. पण या भाजपला हिंदुत्ववादी शिवसेना का नको ते आज आम्हाला कळतंय. तुम्हाला संघमुक्त भारत म्हणणारा नितीश कुमार चालतो. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू चालतात. मेहबूबा मुफ्ती चालतात. पण शिवसेना नको याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मुंबईचा घास गिळता येणार नाही. म्हणून शिवसेना नकोय. म्हणून पक्ष संपवण्याचा विकृतपणा त्यांनी शिवसेनेसोबत केलाय”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले.
”मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण जर कुणी अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे की त्याचा हात जागेवर ठेवू नका. आम्ही कुणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाही. आमच्याच घरात येऊन आम्हाला दादागिरी करतायत त्यांनच्या विरुद्ध आवाज उठवायचा नाही तर लेंड्या टाकायच्या का? आम्हाला एक मराठी माणूस दाखवा परराज्यात जाऊन दादागिरी करतोय. उभा चिरून टाकतील त्याला. मराठी माणसाला जो काही दुहीचा शाप आहे. आज आपण शिवरायांच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे की दुहीच्या शापाला सुद्धा गाडून टाकू. नाहीतर औरंगजेबाचं एक वाक्य शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेलं. या मराठ्यांना पराक्रम शिकवावं लागत नाहीत या मरहट्ट्यांना पहाडी मुलखात साऱ्या दुनियेनला भारी आहेत. पण दुईचं बिज इथे खडकावर जरी भिरकावलं की ते एवढं रुजतं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हा दुहीचा शाप काढून टाकायचा आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
”मला लोकं विचारतात की तुम्ही वडिलांकडून काय शिकलात. मी सांगतो मी भाजपच्या ढोंगावरती लाथ मारायला शिकलोय. भाजपचं हिंदुत्व ढोंग आहे, देशप्रेम हे ढोंग आहे. काश्मिरमध्ये माताभगिनींचा सिंदूर पुसलं त्यानंतर यांनी सिंदूर यात्रा काढली. मग ऑपरेशन सिंदूर केलं. त्यानंतर यांचे चिरंजीव पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला पुढे आले हेच यांचं देशप्रेम. अकोटमध्ये MIM सोबत युती केली. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली. आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. तर अंबरनाथमध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय सोडलं. मोदींच्या घरी ईदच्या दिवशी मुस्लिम कुटंबाकडून जेवण यायचं. ही चांगली गोष्ट आहे. भाजपने काँग्रेस-MIM ला सोबत घेतलं की अमरप्रेम आणि आम्ही काँग्रेसलासोबत घेतलं तर लव्ह जिहाद, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पीपणाची सालटी काढली.
”अजित पवारांच्या होर्डिंगवर एक वाक्य वाचलं की संभाजीनगर नशामुक्त करू. अहो सरकार तुमच्या हातात असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. लोकांच्या घरात पाणी येत नाही पण दारूचे परवाने पटापट मिळतायत. संभाजीनगर नशामुक्त करणार सांगतात मग साताऱ्यात जे अंमली पदार्थ सापडले ती फॅक्टरी कुणाची होती हे जाहीर का नाही करत? त्याची चौकशी करा ना, ते नाही करणार. नको त्या गोष्टी करणार”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच ”भाजपला एका वर्षात 3100 कोटी रुपये निधी मिळाला. आज राज्य सरकार त्याचं आहे, केंद्र सरकार त्यांचं. मुंबई महापालिकेला विविधी करांच्या माध्यमातून १० हजार कोटींची थकबाकी आहे. स्वत:ची खाती भरतायत आणि मुंबई लुटतायत. भाजपचं एक शहर मुंबईच्या बरोबरीने येणारं असेल तर मी काहीही हरायला तयार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
”दिड वर्षापूर्वी बदलापूरमध्ये चिमुकलीवर शाळेत अत्याचार झाले होते. त्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर केला गेला. अक्षय शिंदे तोंड उघडेल म्हणून त्याला गोळ्या घातल्या असं बोलले जात होतं. या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला बदलापूर निवडणूकीत चांगले काम केले म्हणून भाजपने स्वीकृत नगरसेवक केला. नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून विकृत माणसाला स्वीकृत नगरसेवक केलं. ही सगळी बजबजपूरी झाली आहे. राष्ट्रप्रथम असलेला भाजप आम्हाला काही काळ आपला वाटत होता. पण आता त्यांनी सलीम कुत्ताला सोबत घेतलं. प्रफुल्ल पटेलांना तुम्ही सोबत घेतलं. आता हा भाजप दरोडेखोर, बलात्कारी प्रथम असा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. आणि आता त्यांच्या मांडिला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसतायत. तेव्हा देवेंद्र फडणवीस ढीगभर पुरावे घेऊन गेले होते. आता तुम्ही सांगा की ते पुरावे जाळायचे की पुरायचे. एकतर तुम्ही दिलेल्या पुराव्यामध्ये तथ्य असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या किंवा जर ते पुरावे खोटे असतील तर फडणवीसांनी अजित पवारांची माफी मागावी. भाजपच्या निष्ठावंतांची हालत खराब झाली आहे. माखलेल्या बरबटलेल्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना धुवून पुसून खांद्यावर घ्यायचे हेच काम निष्ठावंतांना राहिलं आहे. जयंत पाटील काल बोलले की ये बंद करने आये थे तवायफों के कोठे मगर सिक्कोंकी खनक सुनकर खुदही मुजरा कर बैठे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांना आवाहन करतोय अण्णामलाई येतील आणि जातील पण ओरबाडून आपल्याला काढलं जातंय. म्हणून पोटतिडकीने आम्ही हा लढा उभारलेला आहे. एकच दिवस जगा पण तो वाघाचा जगा. शंभर दिवस शेळीच्या जगण्याला अर्थ नसतो. शेळी म्हणून जगायचे असेल तर भाजपात जा. ‘महाराष्ट्र कधी मरू शकत नाही, महाराष्ट्र कुणी मारू शकत नाही आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही हे दाखवण्याची वेळ आली आहे. ही एकजूट त्यासाठीच केली आहे. रक्त सांडून मिळून दिलेली आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही, झुकू देणार नाही ही शपथ घेऊन युद्धाला सामोरे जातोय”, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.



























































