सरकार आपलेच येणार, फक्त सावध रहा! उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद

724

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचेच सरकार स्थापन होणार. पण सावध रहा. सत्तेची काळजी तुम्ही करू नका. सत्ता आपण आणणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आज दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रेनीसन्स हॉटेल येथे झालेल्या राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत त्याचप्रमाणे अंधेरी येथील ललित हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. समोरून दगाफटका करण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा सावध रहा. कोणत्याही परिस्थितीत आपण सत्ता स्थापन करणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. अफवांकडे लक्ष देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. एकमेकांची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. रेनीसन्स हॉटेल येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठकही झाली. सरकार स्थापनेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

शरद पवार हेच आमचे नेते
आमदारांसोबत झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी आमदारांना तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, असा सवाल केला. यावर आमदारांनी अजित पवार यांचा फोन आल्याचे सांगितले. पण काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत. शरद पवार हेच आमचे नेते आहेत, अशी ग्वाही आमदारांनी दिली.

दिवसभरात
सकाळी 11 – राष्ट्रवादीच्या 51 आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन जयंत पाटील राजभवनवर पोहोचले
11.30 – अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी
जयंत पाटील रवाना
11.35 – नवी दिल्लीत सुप्रीम कोर्टात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी सुरू
दुपारी 12.30 – राष्ट्रवादीचे अध्यक्ष
शरद पवार रेनीसन्स हॉटेलकडे रवाना
12.35 – सोमवारी सकाळी सुनावणी घेण्याचा सुप्रीम
कोर्टाचा निर्णय
3.00 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रेनीसन्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा
3.30 – वसंतस्मृती येथे भाजप आमदारांची बैठक
4.00 – उद्धव ठाकरे यांची हॉटेल ललित

येथे शिवसेना आमदारांशी चर्चा
रात्री 10.40 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खलबते

आपली प्रतिक्रिया द्या