शिवसेनेच्या वर्धापनदिनी निष्ठेचे वादळ! षण्मुखानंदमध्ये तुफान गर्दी, परिसरात भगवे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’… अशा गगनभेदी घोषणा, डौलाने फडकणारे भगवे झेंडे, गळय़ात अभिमानाने भगवी उपरणी घालून दाखल झालेले निष्ठावंत शिवसैनिक-रणरागिणी यामुळे माटुंगा-किंग्ज सर्कल परिसरात आज निष्ठेचे भगवे वादळच घोंगावले. निमित्त होते ‘षण्मुखानंद’ सभागृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 57 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवसैनिक मोठय़ा उत्साहाने दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्यामुळे शेकडो शिवसैनिकांनी दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. मिंध्यांनी कितीही आटापिटा केला तरी आमची निष्ठा ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा ठाम विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात होता. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार अजय चौधरी, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, सूरज चव्हाण उपनेते पराग डाके आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकवले

परिसरात लावण्यात आलेल्या भगव्या कमानी लक्षवेधक ठरत होत्या. शिवसेनेने मराठी माणसाला समाजात स्वाभिमानाने जगायला शिकवले, असा संदेश देणाऱ्या पोस्टरजवळ शिवसैनिक उत्सुकतेने थांबत होते. यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आकर्षक छायाचित्रही होते.

शिवबंधन, झेंडे घेण्याची उत्सुकता

शिवसेना वर्धापन दिन असल्याने सभागृह परिसरात शिवबंधन, भगवे झेंडे, मशाल चिन्ह, बाळासाहेबांचे फोटो, भगव्या उपरणी मिळणारे स्टॉलही लावण्यात आले होते. शिवसेना निष्ठेचे हे प्रतीक घेण्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत होती.

‘हास्यजत्रा’मुळे हास्यकल्लोळ!

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंदमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हास्यसम्राटां’नी सादर केलेल्या कलाकारीमुळे षण्मुखानंदमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. कार्यक्रमाला अनेक वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला. शिवसैनिकांकडून मिळालेले प्रेम आणि प्रतिसादामुळे कलाकारांनीही शिवसेनेचे आभार मानले. ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमात हास्यकलाकार अभिनेता समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदुलकर, शिवाली परब, चेतना भट यांच्या कॉमेडीच्या तडक्याने शिवसैनिक खळखळून हसले. यावेळी कलाकारांच्या कलेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनाही खळखळवून हसवले. त्यामुळे त्यांच्याकडूनही कलाकारांना दाद मिळाली. उद्धव ठाकरे यांनीही ‘हास्यजत्रा’ कलाकारांचे कौतुक केले. ‘बऱ्याच दिवसांनंतर आज आपल्या चेहऱ्याचा उपयोग हसण्यासाठी आहे हे कळलं. नाहीतर धकाधकीच्या जिवनात आपण हसणं विसरलो आहोत. या कठीण परिस्थितीतही तुम्ही अभिनयाच्या जोरावर उपस्थितांना हसवल्याने मी तुम्हाला धन्यवाद देतो,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेशी माझे जुने नाते! प्रसाद खांडेकर भावुक!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सर्वच कलाकारांनी शिवसेनेने कार्यक्रम सादर करण्यासाठी दिलेल्या संधीबाबत आभार व्यक्त केले. यावेळी अभिनेता प्रसाद खांडेकर शिवसेनेसोबत आपले जुने नाते असल्याचे सांगताना भावुक झाले. खांडेकर म्हणाले की, ‘माझे बाबा बोरिवलीत शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. 99 मध्ये बाबांचे निधन झाले. त्यावेळी 14 वर्षांचा होतो. तेव्हाही बाबा मला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला घेऊन जायचे. आज मला शिवसेनेच्याच वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्यासमोर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली, यामुळे खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.’