गुंडागर्दी करणाऱ्या नालायक राज्यकर्त्यांना खुर्चीतून खाली खेचा! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

जो राज्यकर्ता बेरोजगारांना नोकरी देऊ शकत नसेल, महागाई रोखू शकत नसेल, गुंडागर्दी थांबवू शकत नसेल तर तो राज्यकर्ता म्हणून खुर्चीत बसण्यास नालायक आहे. कुणीही असला तरी त्याला खुर्चीवरून खाली खेचावेच लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. विरोधकांवर विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे, ती नसेल तर दुकान बंद करून घरी बसा. पण जिंकल्यावर विरोधकाला खतम करेन ही पाशवी वृत्ती हिटलरसारखी चिरडावीच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन आज प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवन पटांगणावर पार पडले. यावेळी लोकाधिकारच्या हजारो कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. भाजपकडून भारतरत्न पुरस्कारांचा राजकारणासाठी होत असलेला वापर, देशातील हुकूमशाही, वाढती बेरोजगारी, भाजपचे बेगडी हिंदुत्व, महाराष्ट्रातील सत्ताधाऱयांची गुंडागर्दी यावर उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढले.

देशातील तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून दिली होती. त्यात बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचाही समावेश आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर शरसंधान केले. मोदी हे मतांसाठी भारतरत्न देत आहेत, असे ते म्हणाले. 1978-79 मध्ये कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये मागासवर्गीय व वंचितांसाठी सरकारी सेवेत 26 टक्के आरक्षण आणले म्हणून जनसंघाने रस्त्यावर उतरून विरोध केला होता. आता 2024 मध्ये बिहारमध्ये मते हवीत म्हणून कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिले जातेय, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

स्वामिनाथन यांचा शेतकरी अहवालही लागू करा
हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न दिले जाणार आहे. शिवसेनेने तर त्यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी केली होती. आता त्यांना भारतरत्न देत आहात तर त्यांनी शेतकऱयांसाठी दिलेला अहवालदेखील लागू करा. ते न करता भारतरत्न देता हा पोकळपणा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. केवळ झाडे लावणे म्हणजे हरित क्रांती नव्हे, तर झाडे जगवणाऱया शेतकऱयाला जगवणे ही खरी हरित क्रांती आहे, असेही ते म्हणाले.

नेहरूंपेक्षा जास्त सत्ता भोगणाऱया भाजपने काय केले ते सांगा
पंडित नेहरू यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, दरवेळी पंडित नेहरू इतकी वर्षे सत्तेत होते, मात्र देशासाठी काही केले नाही, असा प्रचार केला जातो. नेहरूंच्या चुका काढतात, पण भाजपने त्यांच्यापेक्षा जास्त काळ सत्ता भोगूनही काय केले ते सांगत नाहीत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

नेहरू जाऊन आता 60 वर्षे झाली. मोदी 10 वर्षे पंतप्रधान आहेत, अटलजी 6 वर्षे आणि जनता पक्षाची वर्षे मिळून भाजप नेहरूंपेक्षा जास्त काळ सत्तेत होता. तरीही सर्व दुसऱयावर टाकायचे आणि प्रश्न विचारले तरी त्याला देशद्रोही ठरवून पाकिस्तानात जा म्हणायचे, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे मोदींना उद्देशून म्हणाले की, तुम्ही नोटाबंदी कशी केली, शेतकऱयांवर काळा कायदा कसे आणत होता, याचीदेखील आठवण सांगा. दहा वर्षांपूर्वी डॉलरचा भाव काय होता, गॅस सिलिंडरचे, पेट्रोल-डिझेलचे भाव काय होते, हेसुद्धा सांगा. याचा आढावा कोण घेणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेलाय

माणसाने धर्म बनवला आहे, धर्माने माणूस बिघडवू नका, धर्म धर्म करून माणुसकीला कलंक लावू नका असे प्रबोधनकार म्हणायचे. हिंदुत्वाच्या नावाखाली ते पाप भाजप करत असून त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बजावले. धर्माचा ध्वज अडाण्यांच्या हातात जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात, ते रक्त असते त्या धर्माचेच या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी ऐकवून दाखवत, आज धर्माचा ध्वज अडाण्यांच्या हातात गेलाय आणि त्या ध्वजावरून आपल्या धर्माचे रक्त ठिबकतेय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अडाण्यांच्या हाती धर्माचा ध्वज गेल्याने आमच्याच धर्मबांधवांचे खून पडताहेत. याला उडव त्याला उडव. याला संपव त्याला संपव असे चाललेय. यातून भारतमातेला वाचवण्यासाठी आपल्याला जिद्दीने उभे राहावे लागेल, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक
भाजपाचा घराणेशाहीचा आरोप यावेळी पुन्हा एकदा खोडून काढताना उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या एकाधिकारशाहीवर वार केला. नरेंद्र मोदी संसदेत केलेल्या राजकारणी भाषणात घराणेशाहीबद्दल बोलले होते. पण गद्दारी करून त्यांच्याकडे गेलेल्या गद्दारांच्या घराणेशाहीबद्दल काहीच बोलत नाहीत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. कारण तसे केले तर सर्वात आधी शिवसेनेशी गद्दारी करून गेलेल्या मुख्यमंत्र्याला खाली उतरवावे लागेल, त्याच्या पोराला खाली उतरावे लागेल. सूक्ष्म आणि लघु बसलेत त्यांना उतरावे लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर लत्ताप्रहार केला. एकच घराणे पक्ष चालवतेय त्याला आमचा आक्षेप आहे असे मोदी म्हणत असतील तर आमचासुद्धा त्यांच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि ती मोडून टाकू अशी शपथ घेऊन आम्ही रणांगणात उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिराचे उद्घाटन एकटय़ाने करायचे, संसदेचे उद्घाटन एकटय़ाने करायचे, रस्ता उद्घाटनालाही मीच एकटा ही मोदींची एकाधिकारशाही घराणेशाहीपेक्षाही घातक आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

महाराष्ट्राला करामधला 50 टक्के वाटा मिळालाच पाहिजे
कररूपाने केंद्राला देत असलेल्या पैशांतून हक्काचा वाटा मिळावा यासाठी चार दिवसांपूर्वी दक्षिणेतील राज्यांनी आंदोलन केले होते याचा दाखला देतानाच, महाराष्ट्रालाही करामधला त्याच्या हक्काचा पैसा मिळालाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठणकावून सांगितले. महाराष्ट्र केंद्राला कर म्हणून एक रुपया देतो तेव्हा त्यातील फक्त 7 पैसेच महाराष्ट्राला मिळतात. बाकीचे पैसे जातात कुठे? असा सवाल करतानाच, मोदी गॅरंटीमध्ये बराचसा पैसा महाराष्ट्राच्या कष्टाचा आहे. महाराष्ट्राला करामधला 50 टक्के वाटा मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रात सरकार आल्यानंतर त्यासाठी कायदा बनवण्याचा आग्रह आपण करणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांच्या हाती निवृत्तीनंतरही भगवा; हीच खरी निष्ठा!
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले. लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी तरुण वयात हाती धरलेला भगवा निवृत्तीनंतरही सोडला नाही. यालाच निष्ठा म्हणतात, अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळली तेव्हा उपस्थितांनी शिवसेनेच्या जयघोषाबरोबर टाळ्यांचा कडकडाट केला. शिवसेनेकडे भाजपसारखा पैसा नाही, पण सोन्यासारखी मौल्यवान, निष्ठावंत माणसे सोबत आहेत. हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचे भांडवल आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही शिवसेनेत जे भेकड आणि भाकड आहेत त्यांनी मिंध्यांकडे जावे. मला गरज नाही. मूठभर मावळे चालतील, असे बजावतानाच, लोकाधिकारचे कार्यकर्ते हे जिवंत मावळे आहेत. हातात घेतात ते यशस्वी करून दाखवतात. तुमच्यावर मला विश्वास आहे, असे प्रशंसोद्गारही उद्धव ठाकरे यांनी काढले.

मतांसाठी मोदी हवे त्यांना भारतरत्न देताहेत
भारतरत्न पुरस्कार किती द्यायचे, कुणाला द्यायचे याचे सूत्र होते. आता आले मोदींच्या मना, तसे कुणालाही देतायत. पुरस्कार दिलेत ते लोक जेव्हा हयात होते तेव्हा त्यांना तत्कालीन जनसंघ व नंतर भाजपने पराकोटीचा विरोध केला होता. आता केवळ लोकसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्यांना भारतरत्न देत आहेत. त्यांचा प्रदेश आपल्या पाठीशी येईल, असे मोदींना वाटते. पण काळ एवढा सोपा राहिलेला नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

गेल्या 56-57 वर्षांत शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली आहेत. आताही शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची फरफरी काहींना आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेले नाही की, शिवसेनेची मुळे इतक्या खोलवर गेली आहेत की, ती उपटायला गेलात तर तुम्ही तुमच्या मुळांसकट उपटले जाल.