दिल्लीसमोर महाराष्ट्र कदापि झुकणार नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

1418

महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती आली आणि होत्याचं नव्हतं झालं! हो, ती त्सुनामी होती, पण या संकटाशी सामना करणाऱया शेतकऱयांना मदत करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे. हा दुजाभाव कशासाठी? महाराष्ट्र हा काही लेचापेचा नाही. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, अशा परखड शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. दरम्यान, आमच्या मनगटात ताकद आहे. ही ताकद घेऊन पुढे जायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर आदी उपस्थित होते.

महापूर व अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकार यासाठीची मदत देतच आहे. राज्य सरकार हे संपूर्ण राज्याचे पालक असते, त्याचप्रमाणे केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक आहे. केंद्र सरकारने मात्र महाराष्ट्राच्या मातीवर आलेल्या आपत्तीत मदत करण्यात दुजाभाव सुरू केला आहे. पण महाराष्ट्र हा लेचापेचा नाही. तो कुणापुढे झुकणार नाही. या मातीतील लेकरं कुणासमोर झुकणार नाहीत, असे स्षष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे. कोमातून बाहेर काढण्याचे काम करण्याची खऱया अर्थाने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या इमारतीत बसणाऱया विविध यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी पारदर्शीपणे व सुलभतेने लोकांची कामे करावीत. यावेळी वाळवा तालुक्याची क्रांतिकारकांची, समाजसेवकांची आणि साहित्यिकांची परंपरा व वारसा विषद करून महाराष्ट्राला उत्तमोत्तम देणग्या देण्याची तालुक्याची परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

अर्थव्यवस्था अडचणीत आली असताना ती बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी- उद्योजकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ईश्वरपूर येथे दिली. महाराष्ट्राला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अडचणीत असलेल्या शेतकऱयाला धीर देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, शेवटच्या शेतकऱयाला याचा लाभ पोहोचविणार आहे. याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला तसेच दोन लाखांवर कर्ज असणाऱया शेतकऱयांसाठीही सरकार दिलासादायक निर्णय लवकरच घेईल.

आपली प्रतिक्रिया द्या