
निवडणूक आयोगाच्या ‘मत चोरी’ विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाला अडवून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत यांना ताब्यात घेतले. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग व भाजप वर सडकून टीका केली. आमची लढाई निवडणूक आयोगाशी! सरकार व भाजप त्यांचा बचाव का करतेय? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आज दादरच्या शिवतीर्थावर महायुतीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिल्ली व महाराष्ट्रातील घडामोडींवरून राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरलं.
”आज शिवसैनिकांनी राज्य भरात या सरकारमधील भ्रष्ट मंत्र्याविरोधात आंदोलन केले. त्या मंत्र्यांविरोधात विधीमंडळात, अधिवेशनात पुराव्यानिशी आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले, राज्यपालांना भेटून निवेदन दिले. पण कुणी दाद द्यायला तयार नाही. भ्रष्टाचार ही या सरकारची अपरिहार्यता झाली आहे. जो कुणी भ्रष्टाचारी असेल त्याला सोबत घ्यायचं व भ्रष्टाचाऱ्यांना मुक्त रान द्यायचं हा एककलमी कार्यक्रम या सरकारचं झालं आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
”आज दिल्लीत देखील निवडणूक आयोगाविरोधात इंड़िया आघाडी रस्त्यावर उतरली. सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना पकडून बाजूला नेण्यात आलं, अटक केली. सरकारने केलेली ही कृती म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीला लागलेला एक बट्टा आहे. ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे. त्याच्यात भाजप व सरकार का पडतंय ते उघड झालं आहे. आमची लढाई निवडणूक आयोगाशी आहे, त्यांच्या बचावासाठी सरकार व भाजप का येतोय? या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशात दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या कशाप्रकारे होते हे आज संपूर्ण जगाने पाहिलं. विरोधी नेते म्हणजे देशद्रोही नाही, आजची जागतिक परिस्थिती पाहिली तर अमेरिका ज्या प्रकारे धमक्या देतेय ते देशावरचं संकट मानून आम्ही सर्व विरोधी पक्ष एक दिलाने एक जुटीने पंतप्रधानांच्या सोबत उभे राहायला तयार आहोत. जसे पहलगामच्या वेळी राहिलो. पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काय करू शकतो हे विचारायला हवं होतं. तसं न करता देशावरचं संकट नंतर बघू पण आधी भाजपवरचं संकट व मतांची चोरी कशी लपवता येईल यासाठी आटापिटा सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”दिल्लीत जो काही तमाशा केला तो लांच्छनास्पद आहे, विरोधी खासदारांना सांगितलं की निवडणूक आयुक्तांकडे नेतो व पोलीस स्टेशनला नेलं. दिल्लीत जे घङलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. आपली लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जायची पण आता ती मानली जाते की नाही अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.