चार जूननंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी 4 जून नंतर देशातलं जुमला युग संपणार असल्याचा घणाघात केला आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावरून संघाला सावधानतेचा इशारा देखील दिला.

” तुमच्यासमोर एक निष्ठावान आहे. तर एक गद्दार आहे. गद्दाराची चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचारी सुद्धा आहे. भ्रष्टाचाराचा पैसा पसरतोय. हे बेकअली आहेत. या माणसांकडे ना विचार ना आचार नुसती बेकअली माणसं. 2019 ला भाकड जनता पक्षाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा मी अरविंद सावंतांना फोन करून राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर त्यांनी जराही विचार न करता राजीनामा दिला. मला भाजप व संघाची कीव येते. यांना भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन फिरावं लागतंय. तुमचे संस्कार आचार विचार गेले कुठे? आमचा वापर करून शिवसेनेला फेकण्याचा प्रयत्न केला. आज नड्डा बोलले आहेत. आजपर्यंत आम्हाला आऱएसएसची गरज होती. आता आम्हाला संघाची गरज नाही. आम्ही स्वयंपूर्ण आहोत. मला संघाला सांगायचे आहे की हे जर सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा जास्त धोका तुम्हाला आहे. जे शिवेसनेला नकली सेना म्हणतात. ते संघाला नकली संघ म्हणतील. वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा नरेंद्र मोदींनी बांधला. आम्ही पोलादी पुरुष वल्लभभाईंना मानतो. याच वल्लभभाईंनी आरएसएसवर बंदी घातली होती. तशीच बंदी आऱएसएसवर तुम्ही का घालताय. तुम्हाला त्यांनी जन्म दिला. राजकारणात संधी दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”काल सगळे सुपारीवाले शिवाजीपार्कावर जमले होते. एका सुपारीवाल्याने सांगितले. की यांना का मत देतायत की हे उद्या हे मोदींकडे जाणार. अरविंद बद्दलही कंड्या पिकवल्या जात आहेत. जायचं असतं त्याला तर कधीच गेला असता. पण हुकुशाहीविरोधात तो लढायला उभा आहे. आम्ही ही हुकुमशाही गाडायला लढतोय. दोन सुरतवाले मुंबईची लूट करतायतय. आपल्या मुंबईची लूट सुरू आहे. त्या मुंबईची जिचा सांभाळ आम्ही करतोय व म्हणून आम्ही या हुकुमशहांना गाड़ून टाकणार म्हणजे टाकणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”भाजपकडे आता सांगण्यासाऱखं काही नाही. ते म्हणतात काँग्रेसचा जाहीरनामा मुसलमानांचा आहे, कधी बोलतात माओवाद्यांचा आहे. एक काय ते सांगा. भाजपचा जाहीरनामा हा खाओवादी आहे. जिथे जाल तिथे खा. जाऊ तिथे खाऊ. या लोकांनी देशाचे केवढं मोठं नुकसान केलं आहे. चार जून नंतर जुमला युग संपणार आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना मी आजच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीचे आमंत्रण देतो. यांच्या 2014 च्या शपथविधीला मी गेलेलो, माझ्या बाजूला अमित शहा बसले होते. त्या कार्यक्रमाला विशेष आमंत्रण नवाज शरीफ यांना होतं. आम्ही नवाज शरीफ यांना आमंत्रण देत नाही. जसं तुम्ही शरीफांना आमंत्रण दिलं होतं. तसं आज मी इंडिया आघाडीचा नेता म्हणून तुम्हाला आमंत्रण देतोय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांना लगावला.