
सामना प्रतिनिधी, मुंबई
साम, दाम, दंड, भेद हा ‘कूटनीती’चा भाग आहे असे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टोला हाणला. मुख्यमंत्र्यांनीच आता साम, दाम, दंड, भेद आणि कूटनीतीचा अर्थ सांगावा. मी त्यांच्याकडून मराठी शिकण्यास तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ‘ऑडिओ क्लिप’ उघड केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. ‘मी पण दादा आहे… मोठा ऍटॅक करा! साम, दाम, दंड, भेद वापरा’, असे भाजप कार्यकर्त्यांना सांगणारे मुख्यमंत्री अवघ्या महाराष्ट्राने ऐकले आणि भाजपचा ‘खरा’ चेहरा समोर आला. क्लिप प्रसारित होताच सारवासारव करणारा तातडीचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी वसईत केला. ती क्लिप माझीच आहे असे कबूल करतानाच त्यातील साम, दाम, दंड, भेद हे शब्द मात्र कूटनीती या अर्थाने वापरल्याची मखलाशी मुख्यमंत्र्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या या शाब्दिक कसरतीची चांगलीच ‘शाळा’ घेतली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ती क्लिप त्यांचीच असल्याचे मान्य केले हे महत्त्वाचे आहे, मात्र ही क्लिप शिवसेनेने तोडून मोडून ऐकवल्याचा त्यांचा दावा आहे. आता डिजिटल इंडियात इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि कुशलतेने छेडछाड करणारा एडिटर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी त्याला आणावे. त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. करूद्यात, आम्हीही तक्रार दाखल केली आहे.
बूँदसे गयी वो हौदसे नही आती
मुख्यमंत्री म्हणतात, क्लिप तोडून मोडून दाखवली, मात्र या क्लिपचा गाभाच तो आहे. त्यामुळे हे जर खोटे असेल तर तपासणी करून सिद्ध करा आणि जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करा. क्लिप त्यांची असल्याची कबुली मुख्यमंत्री देतात. बूँद से गयी वो हौद से नही आती, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
































































