कुंभकर्णाला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे 24 डिसेंबरला पंढरपुरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अयोध्येत राममंदिर उभारण्याचे आश्वासन पूर्ण न करणाऱ्या सत्ताधारी कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेना मंदिर मोहिमेचा पुढचा टप्पा सुरू करणार आहे. त्याची सुरुवात येत्या 24 डिसेंबरला पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. गरज पडल्यास पुढच्या टप्प्यात मी राज्याबाहेर जाऊन हा मुद्दा घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी शिवसेना भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राममंदिर आणि दुष्काळाविषयीची शिवसेनेची भूमिका मांडली. ते म्हणाले की, निवडणुका आल्यानंतर ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा दिल्या जातात; पण निवडणुका जिंकल्यानंतर मात्र राम मंदिर या विषयावर कोणी बोलत नाही. 30 वर्षांनंतर एका पक्षाचं मजबूत सरकार, काँग्रेसेतर हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतरसुद्धा राममंदिर बांधलं जात नसेल तर पुन्हा एकदा त्या मुद्दय़ावरून प्रचार करण्याचा अधिकार भाजपाला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे बजावले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्रात सरकार येऊन चार-साडेचार वर्षे झाली तरी राम मंदिराच्या विषयावर कुणी बोलत नाही. काही महिन्यांत लोकसभा निवडणुका येतील. तेव्हा आता कोर्टाकडे बोट दाखवून शांत बसून चालणार नाही. जर इतर विषयांत तुम्ही न्यायालयीन निर्णय फिरवत असाल तर मंदिराचा मुद्दा तुम्हाला कायदा करूनच सोडवावा लागेल आणि तो सोडवणार आहात की नाही हे सांगा आणि त्यानंतरच प्रचाराला लागा, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

गेल्या महिन्यात 24 तारखेला अयोध्येला जाऊन आलो; पण अयोध्येला जाऊन आलो आणि विषय सोडून दिला असे मी करणार नाही, असे वचन देतानाच या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 24 डिसेंबरला आपण पंढरपूरला सभा घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कुंभकर्णाला जागे करणे हा यामागचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतरही गरज लागल्यास पुढच्या टप्प्यात मी राज्याबाहेर जाऊन हा मुद्दा घेईन आणि जोपर्यंत कुंभकर्ण उठत नाही तोपर्यंत हा विषय चालूच राहील, असे त्यांनी ठणकावले.शिवसेनेने उचललेला राम मंदिराचा मुद्दा प्रसिद्धीमाध्यमांनी देशातल्याच नव्हे तर परदेशातल्या हिंदूंपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांच्या मनातदेखील राम मंदिराविषयीच्या भावना उचंबळून आल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. या वेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.

निवडणुकांबरोबर दुष्काळालाही तोंड द्यावं लागेल
दुष्काळाबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं होतं. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ हा हातपाय पसरतोय. जसजसे दिवस पुढे जातील तसतसा हा दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करेल. या दुष्काळातसुद्धा शिवसेना एकमेव पक्ष आहे की जो दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभा राहिला आहे. शिवसेनेने दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे काम सुरू केले आहे. हाही एक मुद्दा आहे की, जो निवडणूक आली की उचलला जातो. तेव्हा निवडणुकांबरोबर दुष्काळालाही सरकारला तोंड द्यावंच लागेल, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.