
दैनिकातील पूर्णवेळ व्यंगचित्रकार ते एका बलाढ्य राजकीय संघटनेचे सर्वेसर्वा, ‘मार्मिक’कार ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख असा प्रवास करीत साठोत्तरी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या इतिहासाला निर्णायक वळण देणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कीर्तिकुमार शिंदे लिखित ‘मातोश्री’ निवासस्थानी ‘इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार’ या डिजिटल चरित्राच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
डिजिटल पोस्टरमध्ये वापरण्यात आलेलं व्यंगचित्र हे बाळासाहेबांनीच, शिवसेनेची स्थापना करण्यापूर्वी ते व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’चे संपादक असताना (1960) रेखाटलं होतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार’ हे आगळंवेगळं डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेलं हे चरित्र डिजिटल माध्यमात प्रसिद्ध होणार असून त्यात बाळासाहेबांची व्यंगचित्रकार म्हणून झालेली जडणघडण, त्यांच्यावरचे कलात्मक व राजकीय प्रभाव, त्यांनी काढलेली ऐतिहासिक व्यंगचित्रं, त्यांच्या व्यंगचित्रकलेची वैशिष्ट्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘मार्मिक’कार ते शिवसेनाप्रमुख हा त्यांचा अद्भुत प्रवास यांबाबतची अत्यंत दुर्मीळ आणि रंजक माहिती असणार आहे.




























































