
23 जानेवारी म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन. याच दिवशी दैनिक ‘सामना’चाही वर्धापनदिन आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 23 जानेवारीला शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवप्रेमींचा जनसागर शिवतीर्थावरील त्यांच्या स्मृतिस्थळी लोटतो. ‘मातोश्री’वरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कोरोनामुळे गेल्यावर्षी ते शक्य झाले नाही. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक हे नाते अतूट आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळा असे आवाहन सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार केले जात आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आदी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन शाखाशाखांमधून केले जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांना गेले अनेक दिवस शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता आला नाही. 23 जानेवारीच्या निमित्ताने तो घडणार आहे. उद्धव ठाकरे रविवारी रात्री 8 वाजता ‘झूम’वरून शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.































































