T20 World Cup 2024 – ऐतिहासिक! युगांडाने मिळवलं टी-20 वर्ल्डकपचं तिकीट, झिम्बाब्वेचा पत्ता कट

2024मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे तिकीट मिळवत युगांडाने इतिहास रचला आहे. आफ्रिका क्लालिफायरमधून नामेबियापाठोपाठ आता युगांडाने वर्ल्डकपचे तिकीट पक्के केले आहे. युगांडाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे झिम्बाब्वेचा मात्र पत्ता कट झाला आहे.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळणार आहेत. नामिबियाच्या रूपाने आतापर्यंत या स्पर्धेसाठी 19 संघ पात्र ठरले होते. उरलेल्या एका जागेसाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा या संघांमध्ये चुरस होती. मात्र युगांडाने रवांडाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत वर्ल्डकपमधील आपले स्थान पक्के केले आहे.

दरम्यान, आज झालेल्या लढतीत युगांडाने नाणेफेक जिंकून रवांडाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अल्पेश राजमानी, दिनेश नाक्रानी, हेनरी सेन्योंदो आणि ब्रायन मसाबा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत रवांडाच्या फलंदाजीला वेसन घातले आणि त्यांचा संपूर्ण डाव अवघ्या 65 धावांमध्ये गुंडाळला. हे नाममात्र आव्हान युगांडाने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. युगांडाकडून रोनक पटेल याने 18, सेसाझी याने 26 आणि मुसाका याने 13 धावांचे योगदान दिले.

वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले संघ

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हिंदुस्थान, नेदरलॅण्ड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा.