उच्च शिक्षण संस्थांना कोरोनाचा सामना करण्यास ‘यूजीसी’ची पंचसूत्री

देशातील उच्च शिक्षण संस्थांना कोरोनाचा सामना करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पंचसूत्री दिली आहे. चाचणी करणे, रुग्णांचे संपर्क शोधणे, उपचार, कोविड बाधा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण अशी ही पंचसूत्री आहे. याशिवाय कोरोनाबद्दल संकेतस्थळ आणि माध्यमांमधून जनजागृती करण्याच्या सूचनाही यूजीसीने दिल्या आहेत.

उच्च शिक्षण संस्था कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी यूजीसीला अपेक्षा आहे. सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी कोरोनाबद्दल जनजागृती करावी. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करावे तसेच लसीकरणाचेही महत्त्व पटवून द्यावे. त्यासाठी संकेतस्थळांबरोबरच प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांचाही वापर करावा असे यूजीसीने कळवले आहे.

कोविड विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर करावा. हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. सॅनिटायझरचा वापर करावा. डोळे, नाक आणि तोंडाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण करून घ्यावे. सोशल डिस्टन्सिंग राखावे. गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. कोविडची लक्षणे आढळल्यास 1075 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर किंवा राज्यांमध्ये दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा याबाबत जनजागृती करावी असे यूजीसीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या