
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोटिंग करीत असताना बोट उलटल्याने बुडणाऱ्य़ा मुलीला वाचविताना पित्याचा व पुत्राचा मृत्यू झाला आहे. वांगी नं. 2 व 3च्या दरम्यान असलेल्या जॅकवेलजवळ ही घटना घडली. विकास गोपाळ शेंडगे व जय विकास शेंडगे (वय 13) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. शेंडगे कुटुंब केम येथे लग्नकार्यासाठी आले होते.
अकलूज येथील गुरुनगरात राहणारे विकास गोपाळ शेंडगे, पत्नी स्वाती, मुलगी अंजली व मुलगा जय हे केम येथे रविवारी लग्नकार्यासाठी आलेले होते. लग्नकार्य पार पाडल्यानंतर उजनी बॅक वॉटरमध्ये वांगीतील मित्र जयवंत सातव यांच्या बोटीतून फेरफटका मारण्यासाठी बसले होते.
वांगी नंबर दोन व तीनच्या मध्ये असलेल्या जॅकवेलजवळ बोट आली असता, अचानक उलटली. यातील सर्वचजण पाण्यात पडले. मुलगी बुडत असल्याचे पाहून विकास शेंडगे यांनी तिला बाहेर काढले; पण ते स्वतः पाण्यात बुडाले. दरम्यान, मुलगाही बुडाला व पत्नी व मुलीला वाचविण्यात यश आले; परंतु विकास शेंडगे व मुलगा जय हे दोघे मात्र बुडून मरण पावले. यावेळी मच्छिमारांनी व इतर लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. केम, वांगी गावे या दुर्दैवी घटनेमुळे हळहळली.

























































