
अल्टीमेट खो-खो लीगचे दुसरे पर्वही संपले. या पर्वातही खो-खो म्हणजे महाराष्ट्र हेच चित्र पुन्हा एकदा अवघ्या हिंदुस्थानने पाहिले. राष्ट्रीय खो-खो संघटनेत आपल्या महाराष्ट्राची किती ताकद आहे याची कल्पना नाही, पण प्रत्यक्ष खेळात महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही. सहा संघापैकी पाच संघांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या खो-खोपटूंकडे होते. जेतेपदाची लढतही महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये रंगली.
महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या या वेगवान खेळाला उशिरा का होईना, आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. एकीकडे कबड्डी सातासमुद्रापार गेली असताना खो-खो मागे राहिला होता, पण आता त्यानेही वेग धरला आहे. खो-खो दम आहे, खो-खोपटू दमदार आहेत हे आता घराघरांत पोहचू लागलेय. आणखी एक मऱहाटमोळा खेळ जागतिक स्तरावर पोहोचणार हे निश्चित झालेय. त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात खो-खोपटूंची खाण आहे आणि त्या खाणीत एकापेक्षा एक मौल्यवान खेळाडू आहेत.
पहिल्याप्रमाणे दुसरे सत्रही महाराष्ट्राच्याच खेळाडूंनी गाजवले. सध्या खो-खोचे सहा संघ आहेत, पण ज्या वेगाने खो-खोच्या दुसऱया पर्वाने आपला करिश्मा दाखवलाय ते सहा संघ निश्चितच वाढतील. खो-खोला आकर्षक बनविण्यासाठी अल्टीमेट खो-खोनेही काही प्रयोग केले आहेत आणि पुढेही त्यांना त्यात आणखी सुधारणा करावी लागणार आहे.
प्रो-कबड्डी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानात कबड्डी शाळेशाळेत पोहोचली. आता आपल्या खो-खोनेही कात टाकलीय. आता तोसुद्धा शाळेत पोहोचायला हवा. प्रत्येक जिह्यात शहरात त्याच्याही आकर्षक स्पर्धा व्हाव्यात म्हणून संघटनांनी आणि संघटकांनी पुढाकार घ्यायला हवा. आज कबड्डीने जागतिक पातळीवर जी लोकप्रियता मिळवली त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. कबड्डी जगात पसरली, पण आपले खेळाडू मागे पडलेत. याला सर्वस्वी आपले संघटकच जबाबदार आहेत. संघटनेवर उत्तरेचे राज्य असल्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंवर वारंवार अन्याय होतोय, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण हे दाखवून देण्याची धमक आज महाराष्ट्राच्या कुणातही नाही. प्रत्येकजण आपापल्या राजकारणात व्यस्त आहे. जे कबड्डीत झालेय, होतेय ते खो-खोत होऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.
महाराष्ट्रच महाराष्ट्र सहाहीकडे
अल्टीमेट खो-खोच्या सहा संघांपैकी पाच संघांमध्ये महाराष्ट्राचे कर्णधार. एवढेच नव्हे तर प्रत्येक संघात निम्मे खेळाडू महाराष्ट्राचे. कुणाला वाटेल की, ही अल्टीमेट खो-खो आहे की राज्य अजिंक्यपद स्पर्धा. स्पर्धेत आक्रमणाचे सर्वाधिक गुण टिपले सोलापूरच्या रामजी काश्यपने. मग त्याच्या मागे वाईचा प्रतीक वाईकर. संरक्षणातही रामजीच सर्वात पुढे. त्याच्यामागे आदित्य गणपुळे, विजय शिंदे. अभिनंदन पाटील, दुर्वेश साळुंखे, अनिकेत पोटे, सूरज लांडे, संकेत कदम असे अनेक खेळाडू स्पर्धेत टॉपवर राहिले. कुणी काहीही म्हणो, अल्टीमेट खो-खोची जान आणि शान महाराष्ट्राचे खो-खोपटू होते आणि आहेत. त्यांच्या आक्रमक आणि सुस्साट खेळाने स्पर्धेला मनोरंजक केले.
अंतिम सामना की लुटूपुटूची लढाई
अल्टीमेट खो-खो लीगच्या अंतिम सामन्याने घोर निराशा केली. चेन्नई क्विकची गन्स धडाडलीच नाही. ज्या जोशात चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच साखळीतील दोन्ही सामन्यांत गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. त्यामुळे सर्वांचे भाकित एकच होते. दुसरे पर्व चेन्नई क्विक गन्स जिंकणार. पण झालं नेमपं उलटं. ज्या रामजीने पूर्ण स्पर्धा गाजवली तो अनपेक्षितपणे पहिल्या मिनिटालाच बाद झाला. त्यानंतर ज्या पद्धतीने चेन्नईने नांगी टाकली किंवा गुजरातचा खेळ झाला. ते पाहून सामना फिक्स आहे की काय अशी शंका येऊ लागली. गुजरातने पहिल्या डावात अफलातून खेळ करत 14-1 अशी प्रचंड आघाडी घेतली. मग दुसऱया डावात चेन्नईला रोखत आघाडी 19-7 अशी कायम ठेवली. हा खेळ पाहून ही लुटूपुटूचीच लढाई वाटत होती. चेन्नईकडून कोणतेही प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे तिसऱया डावात 29-10 अशी 19 धावांची आघाडी घेत गुजरातने आपला विजय जवळजवळ निश्चित केला होता. पण शेवटच्या डावात चेन्नईने गुणांची बरसात करत गुजरातची आघाडी मोडून काढत विजयाच्या दिशेने झेप घेतली. या डावात रामजीच्या आक्रमणाने गुजरातला मैदानावर संरक्षणच करू दिले नाही आणि शेवटचे 40 सेपंद असताना चेन्नईने 26-31 असा स्कोअर करून एक वेगळाच अकल्पनीय खेळ दाखवला. त्यांचा खेळ पाहून नक्की काय चाललेय तेच कळत नव्हते, पण शेवटी गुजरातने 31-26 अशी बाजी मारली. पहिले तीन डाव एकतर्फी झाल्यानंतर शेवटचा डाव चेन्नईने गाजवला. सामना गुजरातने जिंकला असला तरी सामन्यात संघर्षच दिसला नाही.
























































