
पहिल्या खोखो लीग स्पर्धेचा आता उत्तरार्ध सुरू होणार आहे. आज शुक्रवार, 2 सप्टेंबरपासून अव्वल चार संघांमध्ये प्ले ऑफ फेरीचा थरार सुरू होणार आहे. गुजरात जायंट्स, ओडिशा जगरनट्स, तेलगू योद्धाज, चेन्नई क्विक गन्स हे संघ विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत.
प्ले ऑफ फेरीतील क्वालिफायर-1 लढतीत गुजरात जायंट्स (23गुण), ओडिशा जगरनट्स (21 गुण) यांच्यात शुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी पहिला सामना होणार आहे. दुसऱया प्ले ऑफ लढतीत तेलगू योद्धाज (19 गुण) आणि चेन्नई क्विक जन्स (15गुण) यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे.
गुजरातकडून वझीर अभिनंदन पाटील आणि ओडिशाकडून सुभाषिश संत्रा यांनी आक्रमणात 73 आणि 49 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तेलगू योद्धाजने 6, तर चेन्नईने 5 सामने जिंकलेले आहेत. चेन्नईचा रामजी कश्यप हा (19.49 मिनिटे) सर्वोत्तम संरक्षक ठरला असून 130 गुणांसह दुसऱया क्रमांकाचा आक्रमक ठरला आहे. राजस्थानचा मझहर जमादार 105 गुणांसह अव्वल आक्रमक ठरला आहे. तेलगू योद्धाजकडून अरुण गुंकीने 7.78 सरासरी 70 गुण मिळवले आहेत
दोन कोटींची पारितोषिके
अल्टिमेट खोखो लीगच्या पहिल्या सत्रासाठी आयोजकांनी एकूण दोन कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला एक कोटी रुपये पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तिसऱया स्थानावरील 30 लाख व चौथ्या क्रमांकावरील संघाला 20 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्टिमेट खोखो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेंझिंग नियोगी यांनी दिली.
























































