
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्हिसावर बनावट शिक्के लावून अमेरिकेला जाऊ पाहणाऱ्या तिघांना सोमवारी बीकेसी पोलिसांनी अटक केली. मितेशकुमार मनुभाई शर्मा, झुबेर हरीशभाई कोथिया, अलींना झुबेर कोथिया अशी त्या तिघांची नावे आहेत.
मितेशकुमार, झुबेर आणि अलींना हे मूळचे गुजरातचे रहिवासी आहेत. सोमवारी ते तिघे बीकेसी येथील अमेरिकन दूतावासात आले होते. अमेरिकेला जाण्याकरिता त्या तिघांनी व्हिसाकरिता अर्ज केला होता. अर्ज केल्यानुसार त्या तिघांनाही मुलाखतीकरिता बोलावले होते. त्या तिघांच्या व्हिसावर काही देशांचे शिक्के होते. हा प्रकार दूतावासातील अधिकाऱयांना संशयास्पद वाटला. त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्या तिघांनाही चौकशीकरिता ताब्यात घेऊन तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्या तिघांनाही आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्या तिघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





























































