खाणीत बुडून दोन भाच्यांसह मामाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मामासह दोन भाच्यांचा दगडाच्या खाणीतील डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जवळा येथे आज दुपारी घडली.

मयूर संतोष गाढवे (वय 12), सूरज संतोष गाढवे (वय 15, दोघे रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर), संजय भाऊसाहेब खराडे (वय 40, रा. गणेशवाडी, झोळे, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत.

मयूर आणि सूरज हे आपले मामा संजय खर्डे यांच्याकडे आले होते. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गणेशवाडी परिसरात गेले होते. त्या परिसरातील पावसाने भरलेल्या एका दगडखाणीतील पाण्यात शेळ्या धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मयूर व सूरज हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

दोन्ही भाच्यांना वाचविण्यासाठी मामा संजय पाण्यात उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले. याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही बाहेर काढून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

याप्रकरणी भाऊसाहेब कारभारी खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. सहायक फौजदार तोडकरी तपास करीत आहेत.