जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेचे तीनतेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. एकीकडे जिल्ह्यात स्वच्छता गृहाची निर्मिती करून हागणदारी मुक्त जिल्हा करण्याचा मानस असताना जिल्हाधिकारी कार्यलयातच स्वच्छता गृहाची मात्र दैना झाली आहे. या दरवाजे तुटलेल्या स्वच्छता गृहामुळे बाहेरून येणाऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील नागरिक आपल्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. त्यावेळी हे येणारे नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस स्वच्छतागृह असून याठिकाणी मुतारी व शौचालय गृहाची सोय नागरिकांसाठी केलेली आहे. मात्र गेल्या आठ नऊ महिन्यापासून येथील स्वच्छता गृहाच्या शौचालायचे दरवाजे तुटलेले आहेत. मुतारीचे भांडे तुटलेले आहे. पाण्याची सोय नाही. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्यालय असताना नागरिकांच्या सोयीसाठी व स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छता गृह बांधलेले आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन विभागाची करोडो रुपये खर्च करून भव्य अशी इमारत नव्याने बांधण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र स्वच्छतागृहातील शौचालायला दरवाजे व मुतारीचे भांडे लावण्यासाठी प्रशासनाकडे वेळ व पैसे नाहीत का असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.