
19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सराव सामन्यात युवा ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय मिळवला. सलामीच्या सराव सामन्यात यजमान वेस्ट इंडीजला हरवल्यानंतर यश धुलच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर 9 गडी आणि 15 चेंडू राखून विजय मिळवला. मुख्य स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी हिंदुस्थानी खेळाडूंनी विंडीजमधील वातावरणाशी जुळवून घेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही स्तरावर जोरदार सराव केला.
रवी, राजवर्धनची प्रभावी गोलंदाजी
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाला 50 षटकांपर्यंतही फलंदाजी करता आली नाही. 49.2 षटकांत 268 धावसंख्येवर त्यांचा डाव संपला. कर्णधार कुपर कॉनोलीने एकाकी झुंज देताना 125 चेंडूंत 117 धावांची खेळी करताना 14 चौकारांसह 4 षटकार ठोकले. याचबरोबर एडन कॅहिल (27), टॉबियस स्नेल (35) व विल्यम साल्झमन (25) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून रवी कुमारने 4, तर राजवर्धन हंगर्गेकरने 3 फलंदाज बाद केले. राज बावा, कौशल तांबे व निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
शरनूरचे शतक, रशीद, यशची अधशतके
ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाकडून मिळालेले 269 धावांचे लक्ष्य युवा हिंदुस्थानने 47.3 षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले. हिंदुस्थानच्या एकमेव बाद झालेल्या अंगकृष रघुवंशीने 27 धावा केल्या. दुसरा सलामीवीर हरनूर सिंगने 108 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी करताना 16 चेंडू सीमापार पाठवले. रशीद शेखने 74 चेंडूंत 6 चौकार व एका षटकारासह नाबाद 72 धावांची खेळी केली. या दोघांनी फलंदाजीचा मनसोक्त सराव केल्यानंतर इतरांना फलंदाजी मिळावी म्हणून स्वतःहून मैदान सोडले. त्यानंतर कर्णधार यश धुल (नाबाद 50) व दिनेश बना (नाबाद 2) यांनी हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धुलने 47 चेंडूंचा सामना करताना 7 चौकारांसह आपली नाबाद अर्धशतकी खेळी सजवली.

























































