भुयारी गटार योजनेची वाटचाल ‘फेज-2’च्याच दिशेने, नगर मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ठेकेदार करीत नाही. तो महापालिकेत फक्त बिले काढण्यासाठीच येतो. त्यामुळे या योजनेचीही वाटचाल पाणीपुरवठय़ाच्या ‘फेज-2’ योजनेच्या दिशेनेच सुरू असल्याचा आरोप नगर मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. दरम्यान, मनपा आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे सूतोवाच केले आहे.

नगर महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कारकिर्दीतील ही शेवटची सभा होती. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

नगर शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मोठे खड्डे पडलेले आहेत. शहरात ‘अमृत योजने’अंतर्गत भुयारी गटारीची कोटय़वधी रुपयांची कामे सुरू करण्यात आली. मात्र, ही कामे पूर्णत्वाला गेली नसून, या योजनेचा पुरता खेळखंडोबा झाल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मनपा सभागृहात केला. यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधितांची कामे तपासा आणि मगच त्यांना बिल अदा करण्याचा आदेश आयुक्तांना दिला आहे. ठेकेदार काम व्यवस्थित करणार नसेल, तर त्याला ‘काळ्या यादी’त टाकून काम थांबवा व दुसरा ठेकेदार नेमा, असा आदेशही महापौरांनी दिला.

नगरमध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे, खड्डे बुजविले जात नाहीत, असे आरोप नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी केले. तर, श्याम नळकांडे यांनी नगर-कल्याण रोड परिसरामध्ये अमित कॉलनी व इतर कॉलनीमध्ये जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी महामार्गावर येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर आम्हाला बजेट मंजूर करायला उशीर झाला, तसेच निविदाही लवकर काढता आली नाही. मात्र, त्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरात लवकर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली.

शिवसेनेचे नगरसेवक दत्ता कावरे म्हणाले, ‘आमच्या प्रभागात लाइट फिटिंग दिली जात नाही. मात्र, याच प्रभागातील अन्य दोन नगरसेवकांना फिटिंग दिले जाते, ही वशिलेबाजी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावरून सभागृहांमध्ये चांगलाच वादंग झाला. अभियंत्यांना त्यांनी जाब विचारला. त्यांचे उत्तर व्यवस्थित न आल्यामुळे नगरसेवक कावरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ‘अमृत योजने’तील एकही काम व्यवस्थित होत नाही. ठेकेदार काम करीत नाही. तो फक्त बिले काढण्यासाठीच महापालिकेत येतो. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यांचे काम योग्य नसल्याने हरित लवादाने आपल्याला दंड ठोठाविला आहे. त्यामुळे त्यांची बिले देऊ नका, असे सांगितले. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी ‘अमृत योजने’ची जबाबदारी एखाद्या अधिकाऱयावर निश्चित करण्याची मागणी केली. नगरसेवक अविनाश घुले म्हणाले, ठेकेदार गटारीवरील चेंबरचे झाकणही देत नाही. आम्ही स्वखर्चाने ही झाकणे बसविली आहेत. मग या ठेकेदाराचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केले.

नगरसेवक संपत बारस्कर यांनी लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून सर्वसामान्यांना लसीकरण मिळत नाही. आपले काम योग्य नाही. नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाचा सावळागोंधळ आहे. आपण लसीकरण करणार नसाल तर काय उपयोग? असा जाब जनता विचारते. यावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर महापौरांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे सूतोवाच

आयुक्त शंकर गोरे म्हणाले, या ठेकेदाराच्या बाबतीत नगरसेवकांसह अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अमृत योजनेच्या कामांची मीसुद्धा तपासणी केली आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील काम पूर्णत्वाला गेले आहे, असे पत्र दिले तरच ठेकेदाराला पेमेंट केले जाईल. संबंधितांनी योग्य पद्धतीने काम केले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, असा इशारा गोरे यांनी दिला. यावेळी महापौर वाकळे यांनी अभियंता सातपुते यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.