भुयारी मेट्रोसाठी सरकते जिने बसवण्यास सुरुवात, एमआयडीसी स्थानकापासून शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मार्ग असलेल्या भुयारी मेट्रोच्या स्थानकांवर सरकते जिने (एस्कलेटर) बसवण्याचे काम सुरू झाले आहे. एमआयडीसी स्थानकापासून या कामाचा शुभारंभ झाला आहे. नंतर सिद्धिविनायक स्थानकातही सरकते जिने बसवले जातील. या दोन स्थानकांवर सरकत्या जिन्यांचे नमुने बसवले जात असून त्यांची चाचणी केली जाईल. ती यशस्वी झाल्यानंतर अन्य स्थानकांमध्येही सरकते जिने बसवण्याचे काम सुरू करण्यात येईल.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रो स्थानकांवर एकूण 414 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. युआंडा रॉयल कन्सोर्टियम आणि एसजेईसी जॉन्सन कन्सोर्टियम या कंपन्यांद्वारे या जिन्यांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यात येणार आहे. या जिन्यांना डय़ुएल स्पीड आहे. त्याचप्रमाणे त्यात ऊर्जा बचत यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमुळे ऊर्जेची बचतही होईल आणि पुनरुत्पादनही होईल अशी अद्ययावत सोय आहे.

मेट्रो स्थानकात आत आणि बाहेर जाणाऱया मार्गापासून तिकीट घरापर्यंत तसेच तिकीट घर ते प्लॅटफॉर्म अशा दोन भागांत जाण्यासाठी हे सरकते जिने असतील. एमआयडीसी स्थानकात सरकत्या जिन्याचा नमुना बसवण्यास 20 ते 25 दिवस जातील आणि त्यानंतर त्याची चाचणी केली जाईल अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्याने दिली.