
कोरोनामुळे राज्यातील विविध खात्यांमध्ये गेली दोन वर्षे पदांची भरती झालेली नाही. त्यामुळे हजारो पदे रिक्त आहेत. या पदभरतीसाठी ठरवून दिलेली कमाल वयोमर्यादा अनेक बेरोजगार तरुण-तरुणींनी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, बेरोजगारांच्या कमाल वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली.
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य वित्त, गृह, उच्च व तंत्रशिक्षण, जलसंपदा, नियोजन अशा एकूण 25 विभागांकडून अ, ब आणि क गटातील विविध पदांसाठी तब्बल 7 हजार 460 पदांची मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर केलेली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
गुजरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकरभरतीच्या वयोमर्यादेत सवलत दिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी अनेक उत्कृष्ट निर्णय घेतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध खात्यांतील भरतीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेले अथवा ओलांडण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या अनेक बेरोजगार युवकांना विविध खात्यांतील 7 हजार 460 पदांच्या भरतीत बेरोजगार उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी विनंती विधान परिषदेत शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.





























































