
घराचा आधार गमावल्यानंतरही हिंदी-इंग्रजीच्या प्रेमापोटी मराठीद्वेष्टय़ा युनियन बँकेने कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नुकसानभरपाईसाठी हिंदी किंवा इंग्रजीतून अर्ज करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत, अशी मुजोरीच बँकेने केली. यामुळे अन्यायग्रस्त कुटुंब संकटात सापडले असून युनियन बँकेच्या मुजोरीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागपूरच्या योगेश बोपचे या तरुणाचा 8 जून रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र योगेशचा कुठलाही जीवन विमा नसल्याने त्याची पत्नी आणि दोन मुले उघडय़ावर पडली आहेत. नियमानुसार कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आणि एटीएम असल्यास रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतची मदत दिली जाते. त्यामुळे योगेश याच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ लोकेश बोपरेने नागपूर शाखेत संपर्क साधून नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर केला. मात्र हा अर्ज मराठीत असल्याने नाकारला.