हंसराज अहिरांची शेतकऱयांनी केली कोंडी; रथही पिटाळला

आधी शेतमालाला भाव, पिकविमा परतावा, सिचंनासाठी वीज द्या, मग ‘घर चलो अभियान राबवा’, असा निर्वाणीचा इशारा देत शेतकऱयांनी माजी केंद्रीय मंत्री व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची चांगलीच कोंडी केली. एवढंच काय तर काही गावांमध्ये मोदी सरकारच्या या अभियानाचा रथही शेतकऱयांनी पिटाळून लावला.

‘घर चलो अभियान’ कार्यक्रमासाठी हंसराज अहिर लोणी येथे गेले होते. त्यावेळी शेतकऱयांनी अहिर यांना घेरून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शेतकऱयांनी समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. शेतकऱयांच्या रोषासमोर अहिर निरुत्तर झाले. अहिर यांचा लोणीमध्ये मुक्काम ठरला होता. शेतकरी आक्रमक झाल्याने अहिर यांना पळ काढावा लागला.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पिकविमा भरूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. काही ठिकाणी शेतकऱयांना अल्प मोबदला मिळतोय. सोयाबीन व कापसाचे भाव घसरले आहेत. शेतकऱयांमध्ये संतापाची लाट असून अभियानाचा दिखावा करण्यापेक्षा शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली.