भायखळा स्थानकाला गतवैभव मिळणार ! रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली. त्या काळात 166 वर्षांपूर्वी 1853 मध्ये बांधलेल्या भायखळा स्थानकाला गतवैभव मिळवून देण्याचा विडा ‘आय लव्ह मुंबई’या सामाजिक संस्थेने बजाज फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने उचलला आहे. भायखळा स्थानकाच्या साडेतीन कोटी रुपयांतून होणार्‍या या सौंदर्यीकरण आणि जीर्णोद्धाराची सुरुवात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी भायखळा स्थानक इमारतीत झाली. यावेळी मुंबईत दहा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार असून त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

भायखळा स्थानकात पूर्वी आलो असलो तरी मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण येत आहोत. शायना एन. सी. आणि आर्किटेक्ट आभा लांबा तसेच बजाज फाऊंडेशनचे नीरज बजाज यांच्यासारखी संवेदनशील मंडळी चांगल्या कामासाठी एकत्र येत आहेत. हे केवळ सौंदर्यीकरण नसून त्यामुळे प्रवासी सुविधांमध्ये वाढ होणार आहे. मुंबईत दहा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होत आहे. आता आपण चर्नी रोड स्थानकाच्याही सौंदर्यीकरणाचे आदेश महाव्यवस्थापकांना दिल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी ‘आय लव्ह मुंबई – मुंबई माझी लाडकी’ फाऊंडेशनच्या प्रमुख शायना एन. सी., भाजप नेते मधू चव्हाण, आर्किटेक्ट आभा लांबा, आमदार वारीस पठाण, नीरज बजाज, मध्य रेल्वेचे विभागीय व्यस्थापक सुनील कुमार जैन, अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्री नारायण आदी मान्यवर उपस्थित होते.

साडेतीन कोटीतून सौंदर्यीकरण

भायखळा स्टेशनच्या दगडी इमारतीवर दिलेला पेंट हटवून तिचे नैसर्गिक रूप आणले जाणार आहे. इमारतीवर मंगळूरी कौले टाकण्यात येणार आहेत. पुरातन तिकीट खिडकीचेही मूळ स्वरूप जतन केले जाणार आहे. कबुतरे आत येऊ नयेत म्हणून झरोक्यांना जाळी लावण्यात येणार आहे.

सीएसआर फंडातून कामे

सीएसआर फंडातून डोंबिवली स्थानकासाठी ‘डोंबिवलीकर’, कुर्ला, ठाणे, मुंब्राचे उम्मीद फाऊंडेशन, निळजे स्थानकाचे लोढा डेव्हलपर्स लि., सीएसएमटी स्थानकाचे ज्युबिलंट फूड वर्क्स लि., आंबिवली स्थानकाचे नेपच्यून फाऊंडेशन लि., वासिंद स्थानकाचे जेएसडब्ल्यू स्टील, चुनाभट्टी स्थानकाचे बंटस् संघ एज्युकेशनमार्फत काम होणार आहे.