अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठीच राहुल यांनी वायनाड निवडले; रविशंकर प्रसाद यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीसह केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीत पराभवाची भीती वाटत असल्यानेच राहुल गांधी वायनाडला पळाल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. तर अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी राहुल यांनी वायनाडची निवड केल्याचा आरोप केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. राहुल यांनी दक्षिण हिंदुस्थानवर एवढेच प्रेम आहे तर त्यांनी फक्त वायनाडचीच निवड का केली असा सवालही त्यांनी केला आहे.

काही लोक फक्त निवडणुकीसाठी हिंदू बनतात, असा आरोपही प्रसाद यांनी केला. निवडणुका जवळ आल्यावरच ते मंदिरात जातात. पूजा अर्चना करतात. मात्र अल्पसंख्याकांच्या मतावरही त्यांचा डोळा असतो. निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याकांची मते मिळवून राजकारण करण्याचा प्रयत्न ते करतात. मात्र, जनतेला आता जातीयवादी राजकारण समजत असल्याचे जनता आता विकासाच्या बाजूने उभी असल्याचे त्यांनी सांगितले. वायनाड मतदारसंघात फक्त 49 टक्के हिंदू आहेत. तर इतर अल्पसंख्याक आहेत. या मतदारसंघात अल्पसंख्याकांची संख्या जास्त असल्याने त्यांची मते मिळवण्यासाठीच राहुल यांनी वायनाडची निवड केल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला. राहुल यांचे दक्षिण हिंदुस्थानवर एवढे प्रेम आहे, तर त्यांनी वायनाडचीच निवड का केली असा सवालही त्यांनी केला.

वायनाड मतदारसंघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 20,870 मतांनी विजय मिळाला होता. यंदा राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याने आता वायनाड मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात कोण निवडणूक रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता आहे.