राज्यातील विद्यापीठांनी मुलींच्या वसतिगृहात तत्काळ सोयीसुविधा द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांनी मुलींच्या वसतिगृहात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. कलिना कॅम्पसमधील महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहतील विद्यार्थिनींनी वसतिगृहात सोयी-सुविधा उपल्बध करून द्याव्यात यासंदर्भात गोऱ्हे यांना निवेदन दिले होते.

महर्षी कर्वे वसतिगृहातील विद्यार्थिनींना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात पाणीटंचाईबाबत विचारणा करण्यासाठी वसतिगृहातील मुली वॉडर्नना भेटण्यासाठी गेल्या होत्या, मात्र वॉर्डन या मुलींना भेटल्याच नाहीत. त्यामुळे या मुलींनी रात्रभर वॉर्डनच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. याबाबत अनेकदा तक्रार करूनही काही कारवाई झालेली नाही. डिसेंबर महिन्यात या विद्यार्थिनींनी रजिस्टारकडे या गैरसुविधांविषयी तक्रार केली होती. याबाबत पाहणी करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही.

डॉ. नीलम गोऱहे यांनी सदर प्रकरणी वॉर्डनची अनुपस्थिती, लिपिक आणि शिपाई यांच्यामुळे झालेला गैरसंवाद, कार्यालयीन वेळेनंतर आपतकालीन क्रमांक उपलब्ध नसणे, मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत (वॉशरूमची समस्या, खोल्या, फर्निचर, अस्पष्ट पाणी, डास, अस्वच्छ परिसर) पिण्याच्या पाण्याची, गरम पाण्याची तसेच वापराच्या पाण्याची समस्या, इलेक्ट्रिसिटी या तक्रारीबाबात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. तसेच यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सार्वजनिक बांधकाम व उपक्रम मंत्री, मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांना वरील विषयांबाबतीत कार्यवाही करण्याबाबत सुचित करावे, असे गोऱहे यांनी निवेदनात म्हटले आहे.