
राजेंद्र वाडेकर, राहुरी
राहुरी तालुक्यातील वळण-मांजरी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात ३५ वर्षीय विवाहित स्त्रीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. महिलेच्या गळ्यावरील मोठी जखम असून दोरखंडाने गळा आवळून या महिलेला ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत अवस्थेत महिला आढळल्याची खबर वाऱ्यासारखी वळण परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वळणचे पोलीस पाटील सोमनाथ डमाळे यांनी राहुरी पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर या घटनेची सत्यता उजेडात येणार आहे. अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेची ओळख पटविणे तसेच मारेकऱ्यांच्या तपासाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनेनुसार राहुरी पोलीसांनी तालुक्यातील मांजरी, वळण, पिंप्री, पाथरे तसेच नेवासा तालुक्यातील पानेगांव,खेडले परमानंद आदी भागातील पोलीस पाटलांशी संपर्क साधून मयत महिलेच्या वर्णनाची माहिती दिली. सोशल मीडियावर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वळणचे पोलीस पाटील सोमनाथ डमाळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसात आज दुपारी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






























































