एस. टी. च्या मालवाहतूक ट्रकमधून विनापरवाना लाकडाची वाहतूक; देवरुख वनविभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटीच्या कार्गो माल वाहतूक गाडीमधून जंगली लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना देवरूख वनविभागाने कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी (साखरपा) तपासणी नाक्यावर करण्यात आली.

मुर्शी येथे वन उपजत तपासणी नाक्यावर असणारे वनरक्षक सुरज तेली यांनी गाडी तपासणी नाक्यावर आली असता तपासणीसाठी थांबवली. यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठ व सहकाऱ्यांना दिली. यावेळी गाडीची तपासणी केली असता जंगली चिरीव लाकूड आढळून आले. तसेच चालकाकडे त्यांनी विचारणा केली असता इराण्णा सतिश इंडे (मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. रत्नागिरी) असे नाव सांगून विनापासिंगची तुळसणी ते कोल्हापूर अशी लाकडाची वाहतूक करत असल्याचे कबूल केले.

ही कारवाई देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक संजय रणधीर व वनरक्षक न्हानू गावडे यांनी केली. याप्रकरणी गाडी व चालकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. चालक इराण्णा इंडे याच्याविरोधात वनविभागाकडून भारतीय वनअधिनियम 1927 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गाडीतील सुमारे 400 घनफुट लाकूड वनविभागाने जप्त केले आहे.