मेल- एक्सप्रेसचा अनारक्षित प्रवास पुन्हा सुरू, कोरोनाचे रुग्ण घटल्याने घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कोरोनाच्या स्थितीत सुधारणा होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांतील अनारक्षित डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयत्यावेळी प्रवास करणाऱयांना फायदा होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ आरक्षित तिकीटधारकांनाच ट्रेनमध्ये प्रवेश मिळत होता. आता जनरल तिकिटे विकत घेऊन आयत्यावेळी प्रवास करणे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या साथीमुळे रेल्वेने केवळ आरक्षित तिकीधारकांनाच प्रवासास मुभा दिली होती. त्यामुळे अनारक्षित तिकिटांआधारे आयत्यावेळी प्रवास करणाऱयांचे वांदे झाले होते. सध्या महाराष्ट्रासह देशात अन्य ठिकाणी कोरोनाचे पेशंट कमी झाले असल्याने बहुतेक राज्यांत कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता ज्या ट्रेन अगोदरच नियमित क्रमांक आणि वेळापत्रकाप्रमाणे चालविण्यात येत आहेत, त्या ट्रेनमध्ये कोरोनापूर्व काळाप्रमाणे सेकंड क्लासचे डबे एकतर आरक्षित किंवा अनारक्षित प्रवासाकरिता वापरण्यात यावेत, असे आदेश काढले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी सवलत केव्हा?

रेल्वे कोरोनाकाळात विशेष गाडय़ा सोडल्या असून ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ही सवलत रेल्वेने लवकर सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. मात्र ताज्या निर्णयाने सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.