सकाळी सकाळी मुंबईत अवकाळी

उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना सकाळी सकाळीच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलाच दिलासा दिला. पावसामुळे हवेत गारवा आला असला तरी कामावर लवकर जाणाऱ्या मुंबईकरांसह शाळेत जाणाऱ्या मुलांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

मुंबई शहरासह पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे  पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली होती तर हार्बरच्या ट्रेनही उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.

राज्यभरात अजून दोन दिवस खबरदारीचे

राज्यभरात अजून दोन ते तीन दिवस विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस व पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात दोन दिवस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा तसेच पावसाचा अंदाज आहे. याबाबत प्रशासनाने सतर्क केले आहे.

आंबा संकटात

अवकाळी पावसाचा फटका रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्येही बसला असून ऐन हंगामात असणारा आंबा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला असताना राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी संकट येणार असल्याने टेन्शन वाढले आहे. 24 मार्चपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.