मराठवाडा विभागाला अवकाळी पावसाने झोडपले, शेती पिकांची हानी

rampuri-rain

कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली वावरत असलेल्या संभाजीनगरसह मराठवाडा विभागातील नागरिकांना बुधवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. विभागात सरासरी 6.74 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक 10.03 मिलिमीटर पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे, या अवकाळी पावसाचा शेतकऱ्याना जबर फटका बसला असून शेती, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठाही प्रदीर्घकाळ खंडित होता.

कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून प्रयत्नशील असलेल्या नागरिकांवर निसर्गाचा एकप्रकारे कोप झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यासह विभागातील आठही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. विभागात सरासरी 6.74 मिलिमीटर पाऊस झाला आहे. संभाजीनगर मध्ये 3.04 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अन्य जिल्ह्यात जालना – 5.21, बीड – 4.40, लातूर- 9.98 धाराशिव- 5.24, परभणी – 5.80 आणि हिंगोली जिल्ह्यात 7.94 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे विभागातील शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस आल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.आंबा पिकालाही याचा फटका बसला आहे. संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फुलंबी तालुक्यात 5 मिमी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यात सिल्लोड -3.60, पैठण – 2.20, गंगापूर 1.50, वैजापूर – 0.80, कन्नड – 1.80 रत्नपूर- 3.20, सोयगाव 4.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या