
लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल १३६ गावातील १५५१६.२० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आता रब्बी हंगामातील पीक काढणीला आलेले असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुसती घोषणा न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
लातूर जिल्ह्यावर कायम निसर्ग कोपत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दर दोन -तीन वर्षांनंतर दुष्काळ अशी स्थिती निर्माण होत असते. कधी पाऊस अधिक होत आहे तर कधी पाऊसच पडत नाही. मागील दिड दोन दशकांपासून पाहिले तर जिल्ह्यात कायम उशीरा पावसाचे आगमन झाले. पेरणी उशीरा होत असते. त्यामुळे शेतकरी सदैव आर्थिक विवंचनेत सापडलेला आढळतो.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल १३६ गावातील १५५१६.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २३ हजार १०४ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.
लातूर तालुक्यातील ७ गावातील ३२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. १०.२० हेक्टर बागायत क्षेत्रातील आणि फळ पिकांचे नुकसान १ हेक्टर चे झाले आहे. एकूण ११.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील २५ गावातील ४५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २३० हेक्टर जिरायत क्षेञावरील ३५ हेक्टर बागायत क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण २६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले ते रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे. रेणापूर तालुक्यातील २७ गावातील १३१२९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ८०२५ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील ६९३ हेक्टर बागायत क्षेञावरील ३५ हेक्टर फळबाग क्षेञावरील असे एकूण ८७५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अहमदपूर तालुक्यातील ६८ गावातील ९२०५ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ६३०० हेक्टर जिरायत क्षेञावरील, ७० हेक्टर बागायत क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण ६३७० हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. चाकूर तालुक्यातील ९ गावातील २८८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. ११७ हेक्टर जिरायत क्षेञावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
एकंदरीत लातूर जिल्ह्यातील १३६ गावातील २३१०४ शेतकऱ्यांचे १४६७२ हेक्टर जिरायत क्षेञावरील, ८०८.२० हेक्टर बागायती क्षेञावरील आणि ३६ हेक्टर फळबाग पिकांचे असे एकूण १५५१६.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.





























































