रक्ताच्या नात्यानेच दगाबाजी केली – पंकजा मुंडे

94

सामना प्रतिनिधी । मुखेड

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी अनेकांना राजकारणात आणून मोठे केले, पण मुंडे साहेबांचे मीठ खाल्लेली मंडळी मीठाला जागली नाहीत. मुंडे यांचे मीठच अळणी होते. मुंडे यांना रक्ताच्याच नात्याने दगा दिल्याने स्व. मुंडे नाराज होते. तेंव्हा अशा दगाबाज मंडळींना जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असे भावनिक आवाहन राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.

आमदार तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड मतदारसंघातील भेंडेवाडी व मुंडेवाडी येथील नागरिकांनी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पुतळा अनावरण पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदराव केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ.हेमंत पाटील, आ.तुषार राठोड, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.सुधाकर भालेराव, किशनराव राठोड, श्रीराम पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, प्रवक्ते गणेश हाके, माधव साठे, डॉ.माधव पाटील उच्चेकर, नामदेव पाटील, जि.प.सदस्य संतोष राठोड,मुक्तेश्वर धोंडगे, दशरथराव लोहबंदे यांची उपस्थिती होती.

प्रथम स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा अनावरण मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर आ.तुषार राठोड यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह उपस्थितांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी आ.तुषार राठोड यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी मला राजकारणाचे धडे दिले. मुंडे साहेबांना जादूची कांडी कशी फिरावयची हे माहित होते. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवूनच राजकीय खेळी करुन नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जादूची कांडी फिरवून राष्ट्रवादीचा उमेदवार कधी पळवला हे राष्ट्रवादीच्या नेत्यानाही समजले नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता तो घर का भेदी असून रावणाला मदत करण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. या लोकांनी साहेबांना खूप त्रास दिला. साहेब एकटेच वाघासारखे लढून विजेते बनून देवाघरी गेले. साहेबांनी ऊसतोड कामगारांसाठी काम केले. गोरगरीबांची जाण त्यांना असल्याने गरीब जनतेनेही त्यांच्यार प्रेम केले. म्हणून गोरगरीब जनता त्यांना दैवत मानते, असे सांगून भेंडेवाडी व मुंडेवाडी सारख्या खेड्या गावात मुंडे साहेबांचे पुतळे उभारले गेले मात्र परळी तालुक्यात पुतळे नसल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी भास्करराव पाटील खतगावकर, गोविंद केंद्रे, हभप तुकाराम मुंडे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधवराव जायभाये, भिमराव जायभाये, कृउबा सभापती अ‍ॅड. खुशालराव पाटील, जि.प.सदस्य बाळू गोमारे, नामदेव पाटील जाहूरकर, शिवाजी राठोड, अशोक गजलवाड, सुधीर चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राचार्य रामकृष्ण बदने यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या