शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करून पळून गेलेल्या आणखी एका आरोपीला पायधुनी पोलिसांनी अटक केली. आसीफ खान असे त्याचे नाव आहे. पायधुनी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे फिल्डिंग लावून खानला गजाआड केले. तपन मन्ना हे गेल्या डिसेंबरमध्ये मस्जिद बंदर स्थानक येथून जात होते. तेव्हा तेथे तीन जण आले. त्याने तपन याच्यावर वार करून पैशाची पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती समजताच पायधुनी पोलीस घटनास्थळी आले. तपन याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुह्यात पोलिसांनी तपास करून तीन जणांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत खानचे नाव समोर आले. खान हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संतोष रासम, नितीन जाधव, संकल्प मोकल आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी गाझियाबाद येथे सापळा रचून खानच्या मुसक्या आवळल्या.