
सामना ऑनलाईन। लखनौ
देशाला दुहेरी व्यक्तिमत्व असणारा पंतप्रधान नको. देशाला पूर्णपणे समर्पित करून घेतलेला पंतप्रधान हवा. चायवाला किंवा चौकीदार नको, अशा शब्दांत बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
देशाने आतापर्यंत सेवक, मुख्य सेवक, चायवाला आणि चौकीदार पाहिला. ज्यांनी जनतेला नेहमीच दिशाहीन केले. पण, आता देशाला केवळ पंतप्रधानाची गरज आहे, जो देशाचे कल्याणच पाहील, असेही त्या म्हणाल्या. लखनौमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान, मोदींची साथ संघानेही सोडल्याची टीका मायावती यांनी पत्रकार परिषदेनंतर ट्विटरवरून केली. मोदींचे जहाज बुडत असून त्यांचे राजकारण आता संपुष्टात आल्याचेही त्या म्हणाल्या.
























































