चापट मारली, नाका-तोंडातून रक्त; चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

रडत होता म्हणून शिक्षकाने चार वर्षाच्या नर्सरीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण केली. मारल्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळला आणि त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. यानंतर मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. प्रयागराज येथील एका खासगी शाळेत ही घटना घडली.

प्रयागराज येथील महेवा पश्चिम पट्टी येथे राहणाऱ्या विरेंद्र यांचा चार वर्षीय मुलगा शिवाय हा डीडीएस ज्युनिअर हायस्कूलमध्ये नर्सरीमध्ये शिकत होता. याच शाळेत विरेंद्र यांचा मोठा मुलगा सुमित आणि मुलगी पूर्वी ही देखील शिकत आहेत. सुमितने दिलेल्या माहितीनुसार, शिवाय शाळेत रडत असल्याने शिक्षिका त्याला सुमितच्या वर्गात घेऊन आली. शिक्षिकेने त्याला बाकावर बसवले.

शिवाय रडणे थांबवत नव्हता, त्यामुशे शिक्षिकेने त्याला जोरात चापट मारल्याने त्याचे डोके बाकावर आपटले आणि खाली पडला. यानंतर त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. शिवायने शिक्षिकेकडे पाणी मागितले, पण शिक्षिकेने त्याला पाणी दिले नाही. दहा मिनिटांनंतर शिवायची हालचाल थांबली, तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. यानंतर शिक्षिकेने त्याच्या पालकांना फोन करून बोलावले. कुटुंबीयांनी तात्काळ शिवायला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शिवायच्या पालकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालात शिवायच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.