भयंकर ! उत्तर प्रदेशात बलात्काराची तक्रार करणाऱ्या तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील बिहारमध्ये बलात्काराची तक्रार करणाऱ्या एका तरुणीला पाच आरोपींनी जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना घडली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर उन्नावमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पण इतर  दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हिंदुनगर गावात राहणाऱ्या या पीडेतेवर मार्च महिन्यात 5 जणांच्या एका टोळक्याने सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पीडितेने याबद्दल पोलिसात तक्रार केली. नंतर सगळे आरोपी फरार झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यातील एकाला पकडण्यात आले. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच जामिनावर तो सुटला होता. पीडितेने तक्रार केल्याने टोळके चवताळले होते. तिला कायमची अद्दल घडवण्याचा त्यांनी कट रचला होता. पण बलात्काराच्या घटनेमुळे हादरलेल्या पीडितेने घराबाहेर निघणेच बंद केले. यामुळे आऱोपी योग्य संधीच्या शोधात होते. मंगळवारी ही संधी त्यांना मिळाली.

पीडिता भाटन खेडा येथून पायी रेल्वे स्टेशनकडे निघाली होती. त्याचवेळी टोळक्याने तिची वाट अडवली. आरोपींना बघताच पीडीतेने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी त्यातील एकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले व दुसऱ्याने तिला पेटवले. त्यानंतर तिथून ते पसार झाले. भररस्त्यात तरुणी जिंवत जळत असल्याचे बघून नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.