
यूपीएससीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या मुलांना दिल्लीच्या जुन्या महाराष्ट्र सदनात मोफत राहण्यासह तज्ञांचे मार्गदर्शन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीमध्ये राहण्याची सर्वांचीच आर्थिक परिस्थिती नसते. महाराष्ट्रातील जवळपास 80 टक्के विद्यार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जुने महाराष्ट्र सदन हे उच्च व तंत्र शिक्षणासाठी देण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या मुलांना राहण्यासाठी जुने महाराष्ट्र सदन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यूपीएससीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आकडा वाढावा यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन व सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनामध्ये वाढ होत आहे. सातारा नगरपालिकेत शिवसेनेचे उमेदवार उभे करणार आहे. आमची संघटनात्मक घौडदौड सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार भरभक्कम आहे. आघाडीतील विचारविनिमय एकमताने सुरू असून, याबाबत वेगळा काहीतरी अपप्रचार व बदनामी करायची व संशय निर्माण करायचे हे षडयंत्र आहे. आमदारांची नाराजी हे महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


























































