राणा दांपत्याची अटी शर्तींसह जामिनावर सुटका, माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करू असे म्हणून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यामुळे तुरुंगात असलेल्या राणा दांपत्याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांची सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामिनावर सुटका केली आहे.

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दांपत्य हे 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये होतं. पोलिसांनी 23 एप्रिल रोजी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानाहून अटक केली होती. अखेर आज त्यांना जमीन मंजूर झाल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राणा दांपत्याने मुंबई त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना न्यायालयाने फटकारलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. अखेर न्यायालयाने अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. संध्याकाळ पर्यंत त्यांची तुरुंगाबाहेर सुटका होईल असे वकिलांनी सांगितले.

अटी कोणत्या

ते चौकशीसाठी पोलिसांना नेहमी सहकार्य करतील
कुठल्याच पुराव्यांसोबत त्यांनी छेडछाड करणायची नाही.
घटनेशी संबंधित साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांशी राणा दाम्पत्याला संवाद साधण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुन्हा कधी या प्रकारचा गुन्हा केला तर त्यांना जमीन मिळणार नाही.