ऑटोपे, बॅलन्स चेक करण्यावर निर्बंध, 1 ऑगस्टपासून UPI च्या नियमात बदल होणार

यूपीआयच्या नियमात येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून मोठे बदल करण्याची तयारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने केली आहे. यामुळे फोन पे, गुगल पे, पेटीएम आणि यूपीआयचा वापर करणाऱ्या फीचरमध्ये बदल पाहायला मिळतील. सध्या देशभरात यूपीआयचा वापर कोटय़वधी लोक करत आहेत. यातील लाखो युजर्स ऑटोपेला परवानगी देतात. ट्रान्झॅक्शन स्टेटस वारंवार पाहतात. त्यामुळे यूपीआय पेमेंट अॅप्सवरील भार वाढतो. हा भार हलका करण्यासाठी एनपीसीआयने काही मर्यादा घालण्याचे ठरवले आहे. यासंबंधीचे एक सर्क्युलर जारी करण्यात आले असून यात म्हटले की, बँकेने आणि पेमेंट अॅप्स यांनी स्पीड व संख्या मर्यादित करायला हव्या. जर बँकांनी किंवा अॅप्सने याचे पालन केले नाही तर एनपीसीआय कडक कारवाई करू शकते. या बदलांमध्ये ऑटो पेमेंटवरसुद्धा मर्यादा घालण्यात येऊ शकते. जे लोक नेटफ्लिक्स, एसआयपी किंवा अन्य सर्व्हिससाठी यूपीआयच्या ऑटोपेचा वापर करतात, त्यांना आता ऑथरायझेशन आणि डेबिट प्रोसेसिंग केवळ नॉन पिक अवर्समध्ये करता येईल. सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत, सायंकाळी 5 ते 9.30 वाजेपर्यंत पिक अवर्स समजला जाईल. काही दिवसांपासून यूपीआय सर्व्हिस वारंवार क्रॅश होण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे हे नियम आणले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

यूपीआय सिस्टम क्रॅश होणार नाही

ज्या युजर्सला यूपीआय अॅप्समध्ये जाऊन वारंवार बॅलन्स चेक करण्याची सवय आहे, त्यांना 1 ऑगस्टपासून दिवसभरात केवळ 50 वेळा बॅलेन्स चेक करता येईल. वारंवार बॅलन्स चेक केल्याने यूपीआय नेटवर्पवर खूप ताण पडतो. यामुळे यूपीआय सिस्टम क्रॅशसारखी समस्या उद्भवते. यामुळे भविष्यात यूपीआय सिस्टम क्रॅश होऊ नये, यासाठी हा बदल केला जाणार आहे. या नियमामुळे व्यापारी वर्गाला थोडा त्रास होऊ शकत, परंतु यूपीआय नेटवर्क स्थिर ठेवण्यासाठी हे करावे लागणार आहे, असे ईझी पेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुशर्रफ हुसैन यांनी म्हटले आहे.