राज्याच्या मुख्य सचिवपदी मदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

वित्त विभागाचे सचिव यू.पी.एस मदान यांची अखेर राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी. के. जैन यांची देशाच्या लोकपाल समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती हेणार याबाबत उत्सुकता होती. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचेही नाव आघाडीवर होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार मदान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

यू.पी.एस. मदान हे 1983च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते वित्त विभागाचे सचिव होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणात त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. मुख्य सचिवपदाच्या जागेवर डी. के. जैन यांची वर्णी लागल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार आघाडीवर असलेल्या सनदी अधिकारी मेधा गाडगीळ, यू.पी.एस. मदान, सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्यामध्ये तीव्र नाराजी होती. यावेळीही मदान यांच्याऐवजी अजोय मेहता हेच मुख्यमंत्र्यांच्या अधिक पसंतीचे मानले जात होते.  मदान यांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

जैन हे लोकपाल समिती सदस्यपदाची उद्या शपथ घेणार आहेत. त्यामुळे मदान यांच्याकडे आज मुख्य सचिव पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र त्यांच्या नियुक्तीसाठी उद्याच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल. मदान ऑक्टोबर निवृत्त होत असले तरी तो काळ विधानसभा निवडणुकीचा असल्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकते.