
देशात आयएएस, आयपीएस अधिकाऱयांचा तुटवडा आहे. तरुण पीढीचा ओढा स्पर्धा परीक्षांकडे वाढला आहे. त्यानंतरही सनदी सेवांच्या जागा दरवर्षी कमी केल्या जात आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) अलिकडेच सनदी सेवांच्या 712 जागांसाठी जाहिरात दिली. हा आकडा गेल्या वर्षीच्या जागांपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे.
2020 मध्ये 796 जागांसाठी सनदी सेवा परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. यूपीएससीच्या परीक्षेद्वारे सनदी अधिकाऱयांच्या जागा भरल्या जातात. त्यात दरवर्षी वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु 2014 पासून जागांचा आकडा कमी होत असल्याचे दिसून येते. 2014 मध्ये यूपीएससीने 1364 रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली होती. तो आकडा 2020 पर्यंत 47.8 टक्क्यांनी कमी झाला आहे.
सनदी अधिकाऱयांच्या भरतीबरोबरच यूपीएससीकडून इंजिनियरींग सेवा परीक्षा, कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस सेवा परीक्षा, नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी परीक्षा, केंद्रीय सशस्त्र पोलीस सेवा परीक्षा आदी परीक्षाही घेतल्या जातात. त्यातील जागांचा आकडाही घसरल्यासारखा दिसून येतो. यूपीएससीप्रमाणेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ आणि टपाल विभागातील भरती परीक्षांमध्येही रिक्त जागांचा आकडा 2016 पासून कमी-कमी होत असलेला दिसून येतो.





























































