शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे चाणजे ग्रामपंचायत होणार कचरामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या चाणजे ग्रामपंचायतीला ओएनजीसी, उरण प्लांटने तब्बल ३०० कचरा कुंड्या दिल्या आहेत. नुकतेच करंजा ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम पार पडला. ओएनजीसीने दिलेल्या या कचराकुंड्यामुळे ग्रामपंचायतीच्या परिसरात स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. आमदार मनोहर भोईर, शिवसेनेच्या सरपंच हिना कोळी आणि ग्रामविकास अधिकारी अमित तपकिरे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

उरण तालुक्यातील चाणजे ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीत दोन महसूली गावे, २१ गावे मोडतात. गावची लोकसंख्या १९ हजार ४०० एवढी असल्याने ग्रामपंचायतीला सोयी सुविधा पुरवणे कठिण झाले आहे. त्याच प्रमाणे ही ग्रामपंचायत उरण शहराला लागून आहे त्यामुळे येथे नागरिकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीत कचऱ्याची समस्या मोठी आहे. ग्रामपंचायतीकडे घरपट्टी व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे कचऱ्याचे योग्य नियोजन करता येत नव्हते. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमित तपकिरे यांनी यासाठी ओएनजीसीकडे सातत्याने पाठपुरावा करून कचरा निर्मुलनासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगानेच ओएनजीसीने या ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३०० कचरा कुंड्या दिल्या आहेत. या कार्यक्रमाला ओएनजीसीचे कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.