
सामना प्रतिनिधी। उरण
जग प्रसिध्द घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आता बेटावर पोलीस 24 तास ऑन ड्युटी असणार आहे. ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घारापुरी बेटाला सुरक्षा यंत्रणेचा 24 तास पहारा राहणार आहे.
घारापुरी हे जागतिक किर्तीचे पर्यटन स्थळ आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येत असतात. इतर दिवसांपेक्षा विविध सुट्टयांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. पर्यटकांची संख्या वाढत असताना मात्र पर्यटकांना कोणतीही सुरक्षा पुरविली जात नाही. त्याशिवाय आवश्यक सुविधांही मिळत नाहीत. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे सबंधित विविध शासकीय विभागांचे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे पर्यटकांना भेडसावणार्या विविध समस्यांवर चर्चा करुन सोडविण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने शुक्रवारी (30) सबंधित विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकार्यांची बैठक बोलवली होती. पोलीस उपायुक्क्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावरील पुरातन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव,इंटेलिजन ब्युरो विभागाचे सहाय्यक संचालक दिपक ग्रोव्हर,न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर.सी.यादव, मोरा पोलिस ठाण्याचे वपोनि माणिक नलावडे,आयबीचे निरिक्षक एस.चॅटर्जी, मेरिटाईम बोर्ड मोरा विभागाचे निरिक्षक नितिन कोळी,निरिक्षक पी.बी.पवार, पुरातन विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे,घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर,उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य मंगेश आवटे,सदस्या मीना भोईर,सुभद्रा शेवेकर,ग्रामविकास अधिकारी अमित तपकिरे,तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेवर भोईर आणि बेटावरील व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घारापुरी बेटावर येणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. मात्र त्याच्या सुरक्षितेबाबत सुरक्षा यंत्रणा फारसी गंभीर नसल्याची बाब चर्चेतून पुढे आली आहे. गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) येथून पर्यटक घेऊन प्रवासी बोटी घारापुरी बेटावर येतात. बोटीतून घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र पर्यटक माघारी मुंबईक़डे जाताना त्यांची मोजदाद होत नाही. त्यामुळे बर्याच वेळा शेवटची प्रवासी बोट निघुन गेल्यानंतरही काही पर्यटक बेटावरच अडकुन पडतात.शेवटची बोट सुटल्यानंतर मुंबईला पोहचण्यासाठी बोटी कोणतीही सुविधा नसल्याने बेटावर अडकुन पडलेल्या पर्यटकांना राहाण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अडकलेला पर्यटक सामान्य आहे की समाजकंटक, गुन्हेगार,अतिरेकी याबाबत कोणतीही माहिती नसल्याने स्थानिक ग्रामस्थही त्यांना मदत करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना जंगलातच रात्र काढावी लागते.वनखात्याकडेही जंगलात गस्तीसाठी कर्मचारी नाहीत. त्याशिवाय छोट्या-मोठ्या बोटीतून वाशी, न्हावा,उरण,मोरा येथून राजबंदर जेट्टीवरुन लेणी पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांची कुठेही नोंद नसते.अशा सुरक्षितेच्या विविध मुद्दयावरील दुर्लक्षपणामुळे घारापुरी बेटाला निश्चितपणे घातपाताचा धोका संभवतो. त्याशिवाय अतिरेकी कारवायांचाही धोका संभवत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. तसेच पर्यटकांच्या सुरक्षितता आणि सोयी सुविधां आणि इतर विविध मुद्दयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती घारापुरी बेटाच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षा आणि टेहळणीसाठी बेटावरील डोंगराच्या उंचावर पोलीस चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी 24 तास ठाणे अमलदारासह पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी रस्त्यांची दुरुस्ती,पाणपोई आणि शौचालयांची तत्काळ उभारणी आवश्यक आहे.त्यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.घारापुरी बेट आणि बेटावर येणार्या पर्यटकांच्या सुरक्षितेबाबत असलेल्या त्रुटी आणि बैठकीत झालेल्या चर्चेचा व निर्णयाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.
































































