
गव्हाण येथे मुले पळवणाऱ्या टोळीतील महिला समजून तीन महिलांना स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून या महिलांची जमावापासून सुटका केली. स्थानिकांच्या मारहाणीत या तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत कुणी प्रिन्सीपल, शिक्षिका,व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या उच्च शिक्षित असलेल्या तीन महिलांपैकी एकीच्या ५० वर्षीय पतीचे गव्हाण गावात एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध आहेत. आपला संसार मोडू नये यासाठी सदर महिलेला समजावून सांगण्यासाठी या तीन महिला बुरखा परिधान करून पतीचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत गव्हाण गावात पोहचल्या होत्या. येताना ओळख म्हणून त्यांनी या महिलेच्या मुलाचा फोटो सोबत आणला होता. विचारपुस करत आणि मुलाचा फोटो लोकांना दाखवून त्या महिलेचा पत्ता शोधत होत्या. त्या महिलेचे घर सापडल्यानंतर त्या तीन महिला आणि त्या महिलेचे जोरदार भांडण झाले. हे भांडण बघण्यासाठी गावातील आणि शेजारी महिला जमा झाल्या होत्या. गावातील महिलांचा गराडा पाहून या तीन बुरखाधारी महिला घाबरल्या आणि पळू लागल्या. त्यांच्या पाठोपाठ गावातील महिलांनी त्यांचा पाठलाग सूरू केला आणि हा हा म्हणता गावात मुले पळविणाऱ्या महिलांची टोळी आली आहे अशी ओरड सुरू झाली आणि अख्खा गाव या तीन बुरखाधारी महिलांच्या पाठलाग करु लागला. त्यानंतर त्यांना पकडले आणि त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ लहान मुलाचा फोटो सापडल्याने ग्रामस्थांना या महिला मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय आला. मात्र संशयाची कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता महिलांसह गावकऱ्यांनीही त्यांना नाहक मारण्यास सूरूवात केली.आम्ही मुले पळविणाऱ्या टोळीतील नसल्याचे सांगितल्यानंतरही महिलांना मारहाण करण्याचे थांबविले नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या महिलांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली.






























































