
अमेरिकेने एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीसह तब्बल १७ जणांचे अमेरिकन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे. व्हिसा मिळवण्यासाठी केलेली फसवणूक आणि लहान मुलांवरील अत्याचारांसारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांमुळे ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या १७ जणांमध्ये ५० वर्षीय नीरज शर्मा या हिंदुस्थानीचा समावेश आहे. नीरज शर्मा हा न्यूजर्सीमध्ये मॅग्नाव्हिजन एलएलसी नावाची प्लेसमेंट कंपनी चालवतो. त्याने ११ जणांचे H-1B व्हिसा मिळवण्यासाठी खोटे अर्ज केले आणि हे लोक एका मोठ्या जागतिक वित्तीय संस्थेत काम करणार असल्याचा खोटा दावा केला होता. तसेचया अर्जांसोबत जोडलेल्या कागदपत्रांवर त्याने अधिकाऱ्यांच्या बनावट सह्याही केल्या होत्या.
नीरज शर्मा याने २०१७ मध्ये अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्याने आपल्या जुन्या गुन्ह्यांची माहिती लपवून अधिकाऱ्यांशी खोटे बोलल्याचे उघड झाले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र एप्रिल २०१५ ते एप्रिल २०१७ या काळात व्हिसाचा गैरवापर आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्याला नंतर दोषी ठरवण्यात आले.
या कारवाईबद्दल अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे प्रमुख मार्कवेन मुलिन यांनी सांगितले की, “अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे हा एक मोठा अधिकार आहे आणि तो प्रामाणिकपणेच मिळवला पाहिजे. तुम्ही इथे येऊन आमचे कायदे मोडले आणि इमिग्रेशन प्रक्रियेत खोटे बोललात, तर तुम्हाला हा अधिकार गमवावा लागेल.” अमेरिकन कायद्यानुसार, जर कोणी बेकायदेशीर मार्गाने, महत्त्वाची माहिती लपवून किंवा खोटी माहिती देऊन नागरिकत्व मिळवले असेल, तर ते हिरावून घेण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे.
नीरज शर्मा यांच्यासोबतच ज्या इतर १६ जणांचे नागरिकत्व रद्द केले जाणार आहे, त्यांच्यावरही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा हैतीचा नागरिक, १५ वर्षांखालील मुलाचे लैंगिक शोषण करणारा युगोस्लाव्हियाचा नागरिक, लहान मुलांचे अश्लील फोटो बाळगणारा मेक्सिकोचा स्थलांतरित, मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा कोलंबियाचा माजी धर्मगुरू आणि लहान मुलांसोबत गुन्हे केल्याची कबुली देणाऱ्या फिलिपिन्सच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.





























































